मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जनतेने सहभागी व्हावे यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (MMMOCL) 20 नोव्हेंबर रोजी मेट्रो सेवेची वेळ वाढविण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या काळात मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांना सहज आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे, हा या विस्तारित सेवांचा उद्देश आहे.  


मतदानाच्या दिवशी प्रवासाच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन मेट्रो सेवा नेहमीपेक्षा लवकर सुरू होतील आणि रात्री उशिरापर्यंत सुरू राहतील. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी पहिली मेट्रो पहाटे 4 वाजता गुंदवली, दहिसर (पूर्व) आणि अंधेरी (पश्चिम) स्थानकांवरून सुटेल. तर शेवटची मेट्रो 20 नोव्हेंबर, 2024 च्या मध्यरात्री म्हणजे 21 नोव्हेंबर रोजी 1 वाजता सुटेल.  


महत्त्वाचे मेट्रो सेवा तपशील:  


- विशेष वाढीव वेळा
 
- सकाळच्या सेवा : 4 वाजता –  5.22 वाजता  
- रात्री उशिराच्या सेवा : रात्री 11 वाजता –  मध्यरात्री 1 वाजता  
- या वाढीव वेळेत मेट्रो दर 20 मिनिटांनी उपलब्ध असेल


- विस्तारित कामकाज:
  
- एकूण 19 अतिरिक्त फेऱ्या नियोजित करण्यात आल्या आहेत. यामुळे एकूण दैनिक फेऱ्या 243 वरून 262 फेऱ्यांपर्यंत वाढतील.  
- नियमित सेवा 05.22 वाजता ते 23.00 वाजता दरम्यान सुरू राहतील.  


ही योजना केवळ निवडणूक अधिकाऱ्यांचा त्यांच्या मतदान केंद्रांपर्यंतचा आणि परतीचा प्रवास सुलभ करण्यासाठी तर आहेच, त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेसाठी सोयीस्कर वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देत मतदारांचा अधिक मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढवण्यासाठीही या सेवेचे नियोजन करण्यात आले आहे.  


एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे यांनी या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले की, “जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे नागरिक म्हणून, सुरळीत आणि निर्विघ्न निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करणे आपले कर्तव्य आहे. मेट्रो सेवेच्या वेळा वाढवून, आम्ही निवडणूक कर्मचाऱ्यांना आणि मतदारांना विश्वासार्ह आणि आरामदायक प्रवासाचा पर्याय देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून या लोकशाही प्रक्रियेत जास्तीत जास्त सहभाग साध्य होईल.”  


महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका, श्रीमती रुबल अग्रवाल म्हणाल्या की, “निवडणुका या आपल्या लोकशाहीची मुख्य आधारशिला आहेत, आणि एमएमएमओसीएल सार्वजनिक हितासाठी कटिबद्ध आहे. या वाढीव सेवांद्वारे आम्ही प्रत्येक नागरिकाला सोयीस्करपणे मतदान करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच मेट्रो संचालनाची सर्वोच्च गुणवत्ता कायम राखण्याचे आमचे बांधिलकी दर्शवत आहोत.”  


सर्व पात्र मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आणि निवडणूक दिवशी उपलब्ध असलेल्या वाढीव मेट्रो सेवांचा लाभ घेण्याचे एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएलतर्फे आवाहन करण्यात येत आहे.