Mumbai Metro : मुंबईकरांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. आजपासून मुंबई मेट्रो (Mumbai Metro) 3 चा दुसऱ्या टप्पा सुरु करण्यात आला आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते वांद्रे कुर्ला संकुल ते वरळीच्या आचार्य अत्रे चौकापर्यंत भूमिगत मेट्रोचा शुभारंभ करण्यात आला. यामुळं मेट्रोची आणखी सहा स्थानक प्रवाशांच्या सेवेत खुली होणार आहेत. विशेष म्हणजे या मार्गावर आता प्रवाशांना थेट भुयारी मार्गे प्रवास करता येणार आहे. यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वांद्रे कुर्ला संकुल ते वरळीच्या आचार्य अत्रे चौकापर्यंत भूमिगत मेट्रोचा शुभारंभ करण्यात आला. उद्यापासून मुंबईकरांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. मुंबईतील महत्त्वकांशी असणारा मेट्रो 3 चा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यात बीकेसी ते वरळी - आचार्य अत्रे चौक पर्यंत भूमिगत मेट्रोने प्रवास करता येणार आहे. आरे ते कफ परेड असा थेट भुयारी मेट्रो प्रवासासाठी मात्र मुंबईकरांना ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मेट्रो 3 मार्गिकाही 33.5 किमी इतकी आहे. आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा ऑक्टोबर 2024 मध्ये सुरु झाला होता. या दुसऱ्या टप्प्यात बीकेसी स्थानकावरुन प्रवास सुरू केल्यानंतर धारावी, शीतलदेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक असा प्रवास असणार आहे.
बीकेसी ते वरळी नाका स्थानकं कोणती?
1. बीकेसी 2. धारावी 3. शितलादेवी मंदिर 4. दादर 5. सिद्धिविनायक मंदिर 6. वरळी 7. आचार्य अत्रे चौक (वरळी नाका)
मेट्रो 3 दुसरा टप्पा कसा? तिकीटांचा दर काय?
- टप्पा 2 अ - बीकेसी ते आचार्य अत्रे चौक
- स्थानकांची संख्या - 6 (सर्व भूमिगत)
- अंतर - 9.77 किमी
- हेडवे - 6 मिनीट 20 सेकंद
- तिकिटाचे दर - किमान भाडे 10 रुपये तर कमाल भाडे 40 रुपये
- गाड्यांची संख्या - 8
- प्रवास वेळ (बीकेसी ते आचार्य अत्रे चौक) - 15 मिनिटे 20 सेकंद
- फेऱ्यांची संख्या - 244 फेऱ्या
- प्रवास वेळ - आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक - 36 मिनीटे
- तिकिट दर - आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक किमान भाडे 10 रुपये तर कमाल भाडे 60 रुपये
- एकूण एस्केलेटरची (सरकते जीने) संख्या (आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक) 208
- एकूण उद्वाहक (लिफ्ट) संख्या (आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक) - 67
- कनेक्टिविटी - बीकेसी, वरळी यांसारख्या बिझनेस हब्सना जोडले जाणार आहे.
प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये
- वातानुकूलित गाड्या आणि स्थानके
- महिलांकरिता स्वतंत्र आरक्षित डबा
- बॅगेज स्कॅनिंग आणि प्रवाशांची तपासणी
- प्रकाशीत स्थानके आणि प्लॅटफॉर्म
- सुरक्षा कर्मचारी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे 24/7 देखरेख
- स्थानक आणि गाड्यांमध्ये अखंड मोबाईल कनेक्टिव्हीटी
- बाळाच्या डायपर बदलण्याच्या सुविधांसह स्वच्छतागृहे
- 2/3 भाषांमध्ये मार्गदर्शक प्रणाली
- माहिती, जाहिरात आणि मनोरंजनासाठी एलसीडी स्क्रीन
- गरजेनुसार बदल करण्यायोग्य डिजिटल मार्ग नकाशा निर्देशक
- दिव्यांग प्रवाश्यांसाठी (PwDs) व्हीलचेअर ठेवण्यासाठी निर्देशित जागा
- प्रत्येक कोचमध्ये अग्नि शोधक, प्रतिबंधक, धूर शोधक आणि प्रतिबंधक प्रणाली
- आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी आणि नियंत्रक यांच्यात ध्वनी संवाद सुविधा
म्हत्वाची धार्मिक स्थळं आणि मनोरंजनाची ठिकाणं जोडली जाणार
बीकेसी स्थानक मेट्रो मार्ग 2 बी आणि बुलेट ट्रेनशी भविष्यात जोडले जाणार आहे. त्यामुळं प्रवासी संख्येत वाढ होणार आहे. दरम्यान, सिद्धिविनायक मंदिर, माहीम दर्गा आणि माहीम चर्च यांसारखी धार्मिक स्थळे तसेच शिवाजी पार्क, रवींद्र नाट्य मंदिर, शिवाजी मंदिर, यशवंत नाट्य मंदिर, प्लाझा सिनेमा यांसारखी मनोरंजनाची ठिकाणे देखील या मार्गाने जोडली जाणार आहेत.
आचार्य अत्रे चौक ते कफ परेड' येत्या ऑगस्ट महिन्यात जनतेसाठी खुला करण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात मेट्रो नेटवर्कचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत आहे. मेट्रो 3 ही देशातील सर्वात लांब, सिंगल आणि भूमिगत मेट्रो लाईन असून हे एक इंजिनिअरिंग मार्व्हल आहे. या प्रकल्पाची सुरुवात 2017 मध्ये झाली असून, हे काम अत्यंत जलद गतीने अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या मेट्रोचा शेवटचा टप्पा 'आचार्य अत्रे चौक ते कफ परेड' येत्या ऑगस्ट महिन्यात जनतेसाठी खुला करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आत्तापर्यंत सुरू करण्यात आलेल्या मेट्रो मार्गिकेला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मार्गावर एकूण 26 स्टेशन उभारली गेली आहेत. ज्यात प्रत्येक स्टेशनला अनेक एंट्रीमार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेषतः मेट्रो 3 एअरपोर्टशी जोडली जाईल, ज्यामुळे नागरिकांना मेट्रोनेच एअरपोर्टपर्यंत पोहोचता येईल. मुंबईतील इतर मेट्रो मार्गांचे कामही वेगाने सुरू आहे. यावर्षी आणि पुढील वर्षी 50 किमी मेट्रो मार्गांचा विस्तार करून मुंबई महानगर प्रदेश (MMR) सार्वजनिक वाहतुकीद्वारे अधिक प्रभावीपणे जोडला जाईल. लवकरच मुंबईकरांना एकाच तिकिटावर मेट्रो, मोनो, लोकल आणि बसने प्रवास करता येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
महत्वाच्या बातम्या: