मुंबई : मेट्रोमुळे मुंबईत ध्वनी प्रदूषण होतं, मग आयपीएलचा दणदणाट कसा चालतो? हा सवाल उपस्थित केला आहे, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी.


'आयपीएल सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये खूप ध्वनी प्रदूषण होतंय. आवाजाच्या सगळ्या मर्यादा पार झाल्यात. मग ठराविक गोष्टींविरोधातच गळा का काढला जातो? कुणी ऐकतंय का? की क्रिकेटचा विषय आला की वरच्या पातळीवर अपिल करणारे आज भूमिगत होऊन सायलेन्स झोनमध्ये गेलेत!' असं ट्वीट अश्विनी भिडे यांनी केलं होतं.

खरंच मुंबईच्या स्टेडियमवर होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांमुळे आणि सामन्यादरम्यान सुरु असलेल्या डीजेमुळे आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होतो का? हा प्रश्न आहे.

मुंबई मेट्रोच्या ध्वनी प्रदूषणावरुन उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या. मेट्रोच्या अधिकाऱ्यांना न्यायालयाने बरंच सुनावलं. इतकंच काय कामाच्या वेळेच्या मर्यादाही घालून दिल्या. पण मुळात झोपेच्या वेळी सुरु होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांमुळे डेसिबलचे उल्लंघन होत नाही का?

आयपीएल सामन्यांमुळे ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत असेल तर यंत्रणेकडे तक्रार करा, असा सल्ला अश्विनी भिडे यांना हायकोर्टाने दिला. सोशल नेटवर्किंग साईट्सवरील अशा उपहासात्मक कमेंट्सना आम्ही दखलपात्र समजत नाही, असं हायकोर्टाने सांगितलं.

मनोरंजनासाठी कानाचे पडदे फाडून घेणाऱ्यांना भविष्यातल्या विकासासाठी त्रास सहन करण्याचे तारतम्य का नाही? ज्या प्रकल्पामुळे मुंबईचा वेळ, इंधन आणि त्रास वाचणार आहे... त्यासाठी आता त्रास सहन करायला काय हरकत आहे...