यापुढे मेट्रोच्या तिकीटासाठी रांग लावण्याची गरज नाही!
एबीपी माझा वेब टीम | 16 Nov 2017 03:51 PM (IST)
यापुढे मेट्रो प्रवाशांना तिकीटासाठी रांग लावण्याची गरज राहणार नाही. कारण पेटीएम आणि रिडलर या अॅपच्या माध्यमातून मेट्रोचं तिकीट अथवा पासचं रिचार्ज करता येणार आहे.
फोटो सौजन्य : मुंबई मेट्रो
मुंबई : मुंबई मेट्रोनं आपल्या प्रवाशांसाठी आणखी एक 'स्मार्ट पाऊल' उचललं आहे. यामुळे मेट्रो प्रवाशांचा वेळही आणखी वाचणार आहे. यापुढे मेट्रो प्रवाशांना तिकीटासाठी रांग लावण्याची गरज राहणार नाही. कारण पेटीएम आणि रिडलर (Paytm and Ridlr) या अॅपच्या माध्यमातून मेट्रोचं तिकीट अथवा पासचं रिचार्ज करता येणार आहे. या दोन्ही अॅपवर मेट्रोनं SKiiipQ हे फीचर लाँच केलं आहे. त्यामुळे तिकीटासाठी रांग लावण्याची तुम्हाला गरज भासणार नाही. या अॅपमधून तिकीट काढल्यानंतर स्टेशनवर जाण्याआधी आणि स्टेशनवरुन बाहेर पडण्याआधी प्रवाशांना फक्त अॅपमधील तिकीटाचा कोड मशीनवर स्कॅन करावा लागेल. मुंबई मेट्रोनं आजपासून पेटीएम आणि रिडलरच्या साथीनं ही सुविधा सुरु केली आहे.