मुंबई : पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्यानंतर आता भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. 'करुन दाखवलं' म्हणणाऱ्यांनी 'पळून दाखवलं' असं म्हणत भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला, मात्र महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना मुंबईत पाणी तुंबल्याचंच दिसत नाही.


पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आहे. त्यामुळे मतदार शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केंद्रापर्यंत पोहचू शकलेले नाहीत. यावरुन आशिष शेलारांनी शिवसेनेवर टीका केली. मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही. 'करुन दाखवलं' म्हणणाऱ्यांनी पावसानंतर 'पळून दाखवलं' अशा शब्दात शेलारांनी शिवसेनेला लक्ष्य केलं.


दुसरीकडे, अख्ख्या मुंबईची तुंबई झाली असताना विश्वनाथ महाडेश्वर धृतराष्ट्राच्या भूमिकेत गेल्याचं चित्र आहे. कारण पालिकेच्या कामामुळे कुठेच पाणी तुंबल्याचं दिसत नसल्याचं महापौरांनी म्हटलं आहे.

'कालपासून धुवांधार पाऊस कोसळत आहे. पाऊस थांबतो की नाही, असं वाटत होतं. काही ठिकाणी पाणी साचलं मात्र तुंबलेलं नाही' असं महाडेश्वर म्हणाले.

संततधार पावसामुळे सायन, माटुंगा, हिंदमाता अशा अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. महापौरांनी असं विधान केल्यामुळे ते मुंबईत राहतात की अन्य कोणत्या शहरात, असा प्रश्न निर्माण होत आहे.