मुंबई : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आता नव्या निवासस्थानी शिफ्ट होणार आहेत. मुंबईतील प्रसिद्ध राणीच्या बागेतल्या बंगल्यात आता खुद्द मुंबईचे महापौर राहतील. राणी बागेतल्या हरणं, पाणघोडे, मगर, हत्ती, परदेशाहून नव्यानेच आलेले पेंग्विन आणि बऱ्याचशा पक्ष्यांना आता नवा शेजार लाभणार आहे.
शिवाजी पार्कजवळच्या मुंबईच्या महापौर निवासात आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारलं जाणार आहे. त्यामुळे महापौरांना मुंबईत नवं घर शोधावं लागलं. भायखळ्याच्या जिजामाता उद्यानातला अर्थात राणी बागेतला बंगला खरं तर महापौर आणि शिवसेनेला पसंत नव्हता. पण आता पर्यायच उरला नसल्याने राणीच्या बागेतल्या प्राण्यांचा नवा शेजार त्यांना स्वीकारावा लागला.
मुंबईचे प्रथम नागरिक असलेले महापौर थोड्या नाईलाजानेच या नव्या घरी राहायला जाणार आहेत. उद्यानातल्या प्राण्यांनाही नवे शेजारी फारसे रुचलेले दिसत नाहीत. रोज भेटायला येणारे, काहीबाही खायला फेकणारे, सेल्फी काढणारे मनुष्य प्राणी खरं तर त्यांच्या ओळखीचे झाले आहेत. पण म्हणून ही माणसं आता थेट मुक्कामालाच शेजारी येणार म्हटल्यावर त्यांनाही थोडी धाकधूक वाटत असणारच.
शिवसेनेची नकारघंटा
खरं तर महापौरांनाही या प्राण्यांचा शेजार नकोच होता. सध्या महापौर राहायला जात असलेल्या बंगल्याला शिवसेनेने आधीच नाकं मुरडली होती. महापौरांच्या बैठका, वेळी-अवेळी येणारे पाहुणे, गाड्यांची ये-जा यामुळे प्राण्यांना त्रासच होईल. शिवाय महापौरपदाला हा बंगला मुळीच साजेसा नाही, असंच शिवसेना आणि महापौरांचं म्हणणं होतं. पण आता प्रशासन देईल त्या बंगल्यात जाऊ असं म्हणत महापौर आणि शिवसेनेनं गुडघे टेकले.
ज्या बंगल्यात सध्या महापौरांना आपला मुक्काम हलवावा लागणार आहे, तो राणीच्या बागेतील बंगला शिवाजी पार्कजवळच्या बंगल्याच्या तुलनेत खूपच छोटा आहे.
कसा आहे महापौरांचा नवा बंगला?
राणीच्या बागेतला बंगला 1931 साली बांधला गेला. ब्रिटिशांनी मौजमजेसाठी, पार्टीसाठी या बंगल्याचा वापर कॅफेटेरिया म्हणून केला होता. त्या उद्देशानेच हा बंगला बांधण्यात आला होता. 1974 पासून हा बंगला महापालिकेतल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं निवासस्थान झाला.
या बंगल्यात याआधी माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त असिम गुप्ता यांचं वास्तव्य होतं. सध्या इथे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड राहतात. बंगल्याच्या परिसराचं एकूण क्षेत्रफळ 17 हजार चौरस फूट इतकं आहे. तर बंगल्याचं बांधकाम सहा हजार चौरस फूट जागेवर झालं आहे. बंगल्यात खालच्या आणि वरच्या अशा दोन्ही मजल्यांवर प्रत्येकी चार-चार अशा एकूण आठ खोल्या आणि दोन हॉल (सभागृह) आहेत.
शिवाजी पार्क परिसरातील महापौर निवास
शिवाजी पार्क परिसरातील बांगला 40 हजार चौरस फूट परिसरात आहे. मालाडमधल्या खदानीतून आणलेल्या दगडाने बंगल्याचं बांधकाम करण्यात आलं आहे. ही हेरिटेज ग्रेड 2 प्रॉपर्टी आहे. आलिशान ग्राउंड प्लस वन वास्तूच्या मागे समुद्रकिनारा आहे. बंगल्याबाहेर विस्तीर्ण मोकळी जागा, अद्ययावत सुरक्षायंत्रणा, मोठे प्रवेशद्वार आहे.
महापौरांचं 2 बेड रुम्सचं निवासस्थान असून अभ्यंगतांसाठी एक बैठकीची खोली आहे. वरच्या मजल्यावर तीन दालनं आहेत. तळ मजल्यावर कॉन्फरन्स रुम, हॉल, अभ्यंगतांची खोली, उजव्या बाजूला लिफ्ट, अद्यायवत सोयीसुविधा आहेत.
38 नारळाची झाडं असलेली प्रशस्त बाग आहे. बागेत नारळाशिवाय गुलमोहर, पारिजात, वड आणि आंब्याची झाडं आहेत. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, अमिताभ बच्चन सारख्या दिग्ग्जांचा सहवास या वास्तूला लाभला आहे.
शिवसेना आणि भाजपच्या अनेक महत्त्वाच्या बैठकी या वास्तूत पार पडल्या. त्याचबरोबर शिवसेनेच्या अंतर्गत आणि अतिशय वादळी बैठकी पार पडल्या. त्यामुळे या वास्तूला एक वेगळं राजकीय महत्त्व आहे.
राणी बागेत आता येत्या एका वर्षात वाघ, सिंह, काळवीट असे नवे प्राणी आणण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे राणीच्या बागेला पुन्हा जुने दिवस येऊ पाहत आहेत. पण दिवस-रात्र जर इथे मनुष्यप्राण्याचा शेजार लाभला, तर कदाचित ही राणीबाग प्राण्यांची राहणार नाही.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई महापौरांचं राणीच्या बागेतील निवासस्थान कसं असेल?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Nov 2018 12:00 AM (IST)
राणीच्या बागेतला बंगला 1931 साली बांधला गेला. ब्रिटिशांनी मौजमजेसाठी, पार्टीसाठी या बंगल्याचा वापर कॅफेटेरिया म्हणून केला होता. त्या उद्देशानेच हा बंगला बांधण्यात आला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -