मुंबई : मुंबई मॅरेथॉनमध्ये पुन्हा एकदा इथियोपियन धावपटूंचं वर्चस्व पाहायला मिळालं. विशेष म्हणजे हाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटामध्ये सैन्य दलातील धावपटूंनी, तर महिला गटात नाशिकच्या मराठमोळ्या मुलींनी बाजी मारली. हाफ मॅरेथॉनमध्ये एकूण तिघा मराठी धावपटूंनी आपला ठसा उमटवला.
जानेवारी महिन्याचा तिसरा रविवार आणि मुंबई मॅरेथॉन हे समीकरण ठरलेलं आहे. सलग अकराव्या वर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रोकॅम इन्टरनॅशनलच्या वतीनं आज टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं.
हौशी धावपटूंच्या मॅरेथॉन (अमॅच्युअर फुल मॅरेथॉन) ने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई मॅरेथॉनला पहाटे पाच वाजून 40 मिनिटांनी सुरुवात झाली. तर एलिट मॅरेथॉनमध्ये देशविदेशातील नामवंत धावपटूही सहभागी झाले.
या दोन शर्यतींना जोडूनच अर्धमॅरेथॉन, 10 किलोमीटर्स रन, सीनियर सिटिझन्स रन, व्हीलचेअर रन आणि ड्रीम रन अशा पाच शर्यती होत्या. अर्धमॅरेथॉनची सुरुवात वरळी सीफेसवरच्या वरळी डेअरीसमोरुन झाली.
सैन्यदलाचा ठसा
अर्धमॅरेथॉन शर्यतीत सैन्यदलाच्या धावपटूंनी आपला ठसा उमटवला. प्रदीपकुमारसिंग चौधरी अर्धमॅरेथॉनचा विजेता ठरला. दुसऱ्या स्थानावर शंकरपाल थापा असून मराठमोळा धावपटू दीपक कुंभारने तिसरा क्रमांक मिळवला आहे. दीपक हा मूळ कोल्हापूरचा धावपटू आहे.
नाशिकच्या मराठी मुलींची बाजी
महिला अर्धमॅरेथॉनमध्ये नाशिकच्या मराठमोळ्या धावपटूंनी वर्चस्व गाजवलं. संजीवनी जाधवने पहिला, तर मोनिका आथरेने दुसरा क्रमांक पटकावला.
इथियोपियन धावपटूंचं पुन्हा वर्चस्व
इथियोपियाचा सॉलोमन डेक्सिसा मुंबई मॅरेथॉन (एलिट मॅरेथॉन) चा विजेता ठरला. त्याने दोन तास 9 मिनिटं 33 सेकंदात शर्यत पूर्ण केली. इथिओपियाचा शुमेट अकालन्यू दुसरा, तर केनियाचा जोशुका किपकोरि तिसरा आला. महिलांमध्येही इथियोपियाची अमानी गोबेना विजेती ठरली, तर केनियाची बोर्नेस किटूर दुसरी आणि इथियोपियाची शुको जेनेमो तिसरी आली.
एलिट मॅरेथॉनमध्ये भारतीय पुरुषांमध्ये गोपी थोनाकलने विजेतेपद पटकावलं, तर नितेंद्रसिंह रावत द्वितीय क्रमांकावर आला. भारतीय महिलांमध्ये सुधा सिंगने जेतेपद मिळवलं, तर ज्योती गवते दुसरी आली.
विजेत्यांची यादी
एलिट मॅरेथॉन (पुरुष)
प्रथम : सॉलोमन डेक्सिसा (इथियोपिया) 2 तास 9 मिनिटं 34 सेकंद
द्वितीय : शुमेट अकालन्यू (इथियोपिया) 2 तास 10 मिनिटं 01 सेकंद
तृतीय : जोशुका किपकोरि (केनिया) 2 तास 10 मिनिटं 30 सेकंद
एलिट मॅरेथॉन (महिला)
प्रथम : अमानी गोबेना (इथियोपिया) 2 तास 25 मिनिटं 50 सेकंद
द्वितीय : बोर्नेस किटूर (केनिया) 2 तास 28 मिनिटं 48 सेकंद
तृतीय : शुको जेनेमो (इथियोपिया) 2 तास 29 मिनिटं 42 सेकंद
एलिट मॅरेथॉन (भारतीय पुरुष)
प्रथम : गोपी थोनाकल
द्वितीय : नितेंद्रसिंह रावत
तृतीय : स्रीनू बुगथा
एलिट मॅरेथॉन (भारतीय महिला)
प्रथम : सुधा सिंग - 2 तास 48 मिनिटं 32 सेकंद
द्वितीय : ज्योती गवते - 2 तास 50 मिनिटं 47 सेकंद
तृतीय : पारुल चौधरी - 2 तास 53 मिनिटं 26 सेकंद
हाफ मॅरेथॉन (पुरुष)
प्रथम : प्रदीपकुमारसिंग चौधरी
द्वितीय : शंकरपाल थापा
तृतीय : दीपक कुंभार
हाफ मॅरेथॉन (महिला)
प्रथम : संजीवनी जाधव
द्वितीय : मोनिका आथरे
Mumbai Marathon : इथियोपियाचा सॉलोमन डेक्सिसा विजेता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jan 2018 07:36 AM (IST)
अमॅच्युअर फुल मॅरेथॉन, एलिट मॅरेथॉन या शर्यतींना जोडूनच अर्धमॅरेथॉन, 10 किलोमीटर्स रन, सीनियर सिटिझन्स रन, व्हीलचेअर रन आणि ड्रीम रन अशा पाच शर्यती होत्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -