मुंबई : मागील 11 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजातील तरुणांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. मंत्र्यांसोबतच्या बैठकीसाठी आम्हाला न नेता वेगळ्याच मुलांना बैठकीसाठी नेण्यात येतं, असा गंभीर आरोप आंदोलनकर्त्या तरुणांनी केला आहे. याबाबत आता या विद्यार्थ्यांनी मंत्रालयातील सुरक्षा विभागाला एक तक्रार अर्ज दिला आहे. आंदोलक म्हणून जी मुलं मंत्रालयात घुसखोरी करत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना मंत्रालयात अवैधरित्या प्रवेश देणाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या तरुणांनी केली आहे.


काल मदत व पुनर्वसनमंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. यावेळी आमदार विनायक मेटे देखील उपस्थित होते. ज्यावेळी बैठक सुरु झाली त्यावेळी बैठकीसाठी वेगळीच मुलं आली असल्याची बाब विनायक मेटे यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ या मुलांना बैठकीतून बाहेर काढलं. ही गंभीर बाब लक्षात घेऊन मराठा आंदोलकांनी बैठकीसाठी येणाऱ्या त्या मुलांवर कारवाई करावी, तसेच ही मुलं कोणाच्या आशीर्वादाने घुसखोरी करत आहेत, याची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.


गेल्या अकरा दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात ही मुलं आंदोलन करत आहेत. मराठा आरक्षण महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62/2018 मधील कलम 18 नुसार राज्यातील वेगवेगळ्या विभागांमध्ये नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी या तरुणांची आहे. आणि जोपर्यंत नियुक्त्या मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा आंदोलक तरुणांनी घेतला आहे. मराठा आरक्षण महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62/2018 मधील कलम 18 नुसार मराठा उमेदवारांना नियुक्ती मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे. या कलमानुसार असं सांगण्यात आलं आहे की, 9 जुलै 2014 ते 14 नोव्हेंबर 2014 या कालावधीमधील जाहिराती, नियुक्त्या, प्रवेश हे कलम 18 प्रमाणे संरक्षित आहेत. त्यामुळे त्यानुसार कलम 18 आणि 11 जुलैचा शासन निर्णय लागू करून आम्हाला नियुक्त्या देण्यात याव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. आतापर्यंत या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार विनायक मेटे, आमदार नितेश राणे, गंगापूरचे आमदार प्रशांत बंब, मराठा ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी भेट दिली आहे.