घाटकोपर मानखुर्द लिंक रोड पासून जवळच असलेल्या या झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात काळे तेल, साबण बनविण्याचे साहित्य, रद्दीअशी अनेक ज्वलनशील साहित्य असलेली गोदामे आहेत. त्यामुळे इथे वारंवार आग लागण्याचे प्रकार घडत असतात.
आज सकाळी सहा वाजताच्या दरम्यान अशाच एक गोदामाला आग लागली आणि ही आग आजू बाजूच्या गोदामात पसरली. घटनेची माहिती मिळताच सुरुवातीला अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ज्या ठिकाणी ही आग लागली तिथून काहीच अंतरावर नागरिकांची वस्ती आहे. तिथं दाटीवाटीनं लोक राहतात. सकाळी मोठ्या प्रमाणात धूर झाल्यानंतर त्यांना आगीची माहिती मिळाली आणि ते लोक घराबाहेर पडले. सध्या कोरोनाची भीती आणि त्यात ही आग लागल्याने इथले लोक पुरते हादरुन गेले आहेत.
ही केमिकल आणि भंगारची गोदामं आहेत. या ठिकाणी अवैध धंदे चालतात, अशी माहिती नागरिकांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. लोकवस्तीला लागूनच हे सुरु असल्यानं नागरिकांना त्याचा त्रास होतो. याबाबत पालिकेकडे तक्रार करुन देखील दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला आहे.
गेल्या काही वर्षात याच भागात वारंवार आग लागण्याचा घटना घडत असून इथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदाम आणि अनधिकृत धंदे असून प्रशासन याकडे वारंवार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नेहमी स्थानिक करीत असतात. अजून तरी या आगीत कोणतीही जीवितहानी समोर आली नसली तरी आगीत अनेक गोदाम जळून खाक झाले आहेत.