मुंबई : खरंतर एक एप्रिल हा दिवस थट्टा मस्करी करण्याचा दिवस. पण मुंबईत राहणाऱ्या सुशील नरसियां यांच्याबाबत एप्रिल फूलला असा प्रकार घडला, जो ते आयुष्यात विसरणार नाहीत.

अॅप आधारित टॅक्सी सेवा उपलब्ध करुन देणाऱ्या 'ओला'ने एका ग्राहकाला चक्क 149 कोटी रुपयांचं बिल दिलं.

सुशील नरसीन यांनी मुलुंड पश्चिममधील त्यांच्या घरापासून वाकोला मार्केटसाठी ओला कॅब बुक केली. पण ड्रायव्हरला त्यांचं घर सापडत नव्हतं, कारण त्याचा फोन बंद पडला होता. त्यानंतर सुशील स्वत:च ड्रायव्हरच्या दिशेने चालत गेले. परंतु ड्रायव्हरने राईडच रद्द केली.


जेव्हा सुशील नरसीन यांनी दुसरी कॅब बूक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी जे पाहिलं त्यावर कोणालाही विश्वास बसणार नाही किंवा एप्रिल फूलचा जोक वाटेल. त्यांना दुसरी कॅब बूक करता आली नाही, कारण त्यांच्यावर 1,49,10,51,648 रुपयांचं बिल होतं. इतकंच नाही तर कंपनीने वॉलेटमध्ये आधीच असलेले 127 रुपयेही कापले होते.

याबाबत बोलताना सुशील नरसियां म्हणाले की, "सुरुवातीला एप्रिल फूल बनवत असल्याचं मला वाटलं. नंतर मी कंपनीच्या सोशल मीडियाशी संपर्क केला. तेव्हा कंपनी तांत्रिक कारणामुळे असं झाल्याचं सांगितलं. कंपनीने माझे पैसे परत केले. तसंच 149 कोटी रुपयांच्या बिलाची तांत्रिक अडचणही दोन तासात दूर केली."

एवढं मोठं बिल पाहून लोकांनीही सोशल मीडियावर ओलाला ट्रोल केलं.