मुंबई : एका बिझनेसमनने पैशांनी भरलेली बॅग चोरणाऱ्या तरुणाचा रिक्षातून फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन पकडलं. मुंबईतील बोरिवलीमध्ये गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला.
ट्रॅफिक सिग्नलजवळ थांबलेल्या कारमधून पाच लाख रुपयांची रोकड असलेली बॅग 27 वर्षीय तरुणाने चोरली. यासिन धोबी असं आरोपी तरुणाचं नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. तर त्याचा सहकाऱ्या पळून जाण्यात यश आलं.
कशी झाली चोरी?
बिझनेसमन किरण मकवाना यांची कार बोरिवली पश्चिमेच्या आर एम भट रोडवर ट्रॅफिक सिग्नलला थांबली होती. त्यावेळी एकाने मकवाना यांच्या कारची काच ठोठावली. त्यांनी काच खाली केली असता, दुसऱ्याने कारच्या सीटवर असेलली पैशांची बॅग पळवली. त्यानंतर दोघेही पसार झाले.
रिक्षातून पाठलाग
यानंतर मकवाना गाडीतून उतरले आणि त्यांचा पाठलाग करु लागले. काही अंतर धावल्यानंतर चोरट्यांनी रिक्षात बसून पळ काढला. मग मकवाना यांनीही रिक्षात बसून त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. प्रत्यक्षदर्शींपैकी काहींनी गस्तीवर असलेल्या देवीदास रसाळ आणि मसेकर या पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसही दुसऱ्या रिक्षातून चोरांचा पाठलाग करु लागले.
पाच लाख रुपये परत मिळाले!
अखेर मकवाना यांनी इतर नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने यासिन धोबीला पकडलं. पण धोबीचा सहकारी मात्र पळून गेला. दिलासादायक गोष्ट म्हणजे पैशांची बॅग धोबीसोबत असल्याने ते परत मिळाले.
यासिन धोबी हा गर्दीच्या ठिकाणांवरुन बॅग चोरणाऱ्या टोळीचा सदस्य असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.