मुंबई : गेली 15 वर्ष पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला मुंबईत बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे यावेळीही आरोपी वॉशिंग मशिनमध्ये लपून पोलिसांना चकवा देण्याच्या तयारीत होता.


54 वर्षीय आरोपीला पोलिस एक लाख रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात शोधत होते. मात्र गेल्या 15 वर्षांपासून तो पोलिसांना चकवत होता.

आरोपी पत्नीसोबत जुहूमधल्या थ्री बीएचके फ्लॅटमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिथे पोहचताच जवळपास तीन तास आरोपीच्या पत्नीने पोलिसांची दिशाभूल केली. आरोपी घरात कुठेच न सापडल्यामुळे पोलिस निघण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी त्यांनी वॉशिंग मशिनवर असलेला कपडा बाजूला सारला आणि आरोपी सापडला.

2002 मधील फसवणुकीच्या प्रकरणात कोर्टाने आरोपीला फरार घोषित केलं होतं. बीएडसाठी अॅडमिशन देण्याच्या आमिषाने त्याने तिघा जणांना एक लाख रुपयांना फसवल्याचा आरोप होता. पुण्यातील एक कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातही पोलिस त्याचा शोध घेत असल्याची माहिती आहे.

सरकारी अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपीच्या पत्नीविरोधातही पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.