Mumbai Malvani Chaos: मुंबईच्या (Mumbai News) मालाडमधील (Malad News) मालवणी (Malvani News) परिसरात रामनवमीनिमित्त (Ram Navami 2023) निघालेल्या शोभायात्रेत गोंधळ झाला. शोभायात्रेदरम्यान दोन गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 25 जणांना अटक केली आहे. दरम्यान, सध्या मालवणीमधील परिस्थिती नियंत्रणात असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. 


मालवणी गोंधळ प्रकरणी पोलिसांनी 25 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांवर वातावरण बिघडवल्याचा आरोप लावण्यात आला आहे. सध्या 25 आरोपींना मालवणी पोलीस ठाण्यातच ठेवण्यात आलं आहे. अटक केलेल्या सर्वांना आज बोरिवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडीओच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली आहे. 


रामनवमीनिमित्त मालाडमधील मालवणी परिसरात रामनवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत गोंधळ उडाला होता. शोभायात्रेदरम्यान दोन गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि त्याचवेळी तणावाचं वातावरण निर्माण झालं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. सध्या मालवणी परिसरात तणावाचं वातावरण असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे. 


प्रकरण नेमकं काय? 


काल मालवणी येथे रामनवमीनिमित्त शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजप युवा मोर्चा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं या शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. शोभा यात्रेदरम्यान दोन गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झाली होती. दोन गटांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतरही सर्व सुरळीत न झाल्यामुळे पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, या मागणीसाठी भाजप युवा मोर्चा आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मालवणी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याप्रकरणी पोलिसांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. 


आजही पोलीस स्टेशनबाहेर आरोपींच्या नातेवाईकांचा गोंधळ 


मालवणी पोलीस ठाण्याबाहेर उपस्थित लोकांकडून त्यांची मत जाणून घेत असताना पुन्हा दोन गटात बाचाबाची झाली. त्यानंतर मालवणी पोलिसांनी दोन्ही गटातील लोकांना काही काळासाठी ताब्यात घेतलं.


काल शोभायात्रेत सहभागी झालेल्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत बोलताना सांगितलं की, शोभायात्रेदरम्यान दोन गटांकडून जोरदार घोषणाबाजी झाली. त्यानंतर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. शोभायात्रेत उपस्थित असलेले एबीपी न्यूजला प्रतिक्रिया देत असतानाच तिथे असलेला एक तरुण आरडाओरडा करु लागला आणि पुन्हा पोलीस स्थानकाबाहेर दोन गटांत बाचाबाची झाली.