Mumbai: अवघ्या देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय, दिवाळी म्हटलं की फटाके फोडणे आलेच. या काळात अनेक जण विविध फटाके फोडतात. पण याचाच परिणाम मुंबईकरांसाठी अत्यंत चिंताजनक आहे. कारण याच फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. मुंबईतील महत्वाचे ठिकाण असलेले शिवडी, मालाड, कांदिवली, भायखळ्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालीय.
फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली
सध्या दिवाळी सण असल्याने मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जात आहे. याच फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली असून मालाड, शिवडी आणि कांदिवलीत हवा गुणवत्ता निर्देशांक खालावल्याची चिंताजनक बाब समोर आलीय. मोठ्या प्रमाणात फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि आतिषबाजीनं एक्यूआय 200 पार गेला आहे, जो अत्यंत वाईट श्रेणीत आहे. तर शिवडीत हवा गुणवत्ता निर्देशांक अतिशय वाईट श्रेणीत जात 300 पार, शिवडीतील एक्यूआय 303 वर असल्याचे समोर आले आहे. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईतील मालाड पश्चिमेकडे एक्यूआय 290 वर तर कांदिवली पश्चिमेकडे एक्यूआय 266 वर आहे. तर भायखळामध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक 204, देवनार परिसरात हवा गुणवत्ता निर्देशांक 206 वर नोंदवण्यात आला आहे
मुंबईकरांनो सावध राहा! 'असा' त्रास होऊ शकतो..
सध्याच्या काळात मुंबईत फटाके मोठ्या प्रमाणात फोडले जात असल्यामुळे वायु प्रदुषणही मोठ्या प्रमाणात होत असल्याचं समोर आलं आहे, मात्र जास्त काळ वाईट श्रेणीतील वातावरणात राहिल्यास नागरिकांना श्वास घेताना त्रासाला सामोरे जावं लागू शकतं. सोबतच, डोळ्यात जळजळ होणे, अस्थमा आणि श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांना देखील त्रासाला सामोरे जावे लागणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलाचा डोळा निकामी, शहरात 40 भाजले
एकीकडे सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये याला गालबोट लागल्याचं समोर आलंय. दिवाळीनिमित्त फटाके फोडताना 40 जण भाजल्याच्या घटना दिवाळीच्या दिवशी घडल्या आहेत. संबंधित 19 रुग्णांना घाटी रुग्णालयात, तर खासगी रुग्णालयात 21 रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. भुईनळ्याचा स्फोट झाल्याने एका 12 वर्षांच्या मुलाचा डोळा निकामी झाला, तर सुतळी बॉम्ब हातात फुटल्याने एकाचा पूर्ण हात भाजला आहे. बहुतांश रुग्ण 10 टक्क्यांपर्यंत भाजलेले आहेत.
पुण्यात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहरात 31 ठिकाणी आगीच्या घटना
शहरात शुक्रवारी सायंकाळी फटाक्यांच्या आतषबाजीमुळे विविध भागात 31 ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. अग्निशामक दलातील जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.लक्ष्मीपूजनानिमित्त शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. लक्ष्मीपूजनानंतर सायंकाळी सात ते रात्री 12 या कालावधीत शहरात 31 ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या.या भागातील अग्निशामक दलाच्या केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.