मुंबई : कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी रुग्णालयात मोबाईल आणि टॅब वापरत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयानंतर आता मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमधील (Bombay Hospital) हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान पोलिसांनी आरोपीचा मोबाईल आणि टॅब दोन्हीही जप्त केले असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉक्स अँड किंग्सचा प्रवर्तक अजय अजित पीटर केरकर याला ईडीने अटक केली होती. त्यानंतर 2020 मध्ये आर्थर रोड कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली. पंरतु त्याच्या प्रकृतीमुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मागील साडेचार महिन्यांपासून अजित पीटर केरकर याच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. पण तो हॉस्पिटलमध्ये मोबाईल आणि टॅब वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल आणि टॅब जप्त केलेत. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांचे स्थानिक शस्त्र युनिटचे अधिकारी तैनात होते. त्यामुळे तो मोबाईल आणि टॅब त्याच्यापर्यंत पोहचलाच कसा असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय. 


नेमकं काय घडलं?


अजय अजीत पीटर केरकर यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर त्याने जवळपास 5600 कोटीपेक्षा जास्त घोटाळे केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. त्यानंतर त्याची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली. पंरतु प्रकृतीच्या कारणामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आर्थर रोड तुरुगांतील अधिकाऱ्यांनी जेव्हा रुग्णालयाला भेट दिली तेव्हा अधिकाऱ्यांना त्याच्याजवळ मोबाईल सापडला. या प्रकरणात  भारतीय दंड संहिता आणि कारागृह कायद्यान्वये आझाद मैदान पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


ललित पाटील प्रकरणानंतर मुंबई दुसरं प्रकरण उघडकीस 


काही दिवसांपूर्वी पुण्यातील ललित पाटील प्रकरण उघडकीस आलं  होतं. त्यानंतर आता मुंबईतील हे प्रकरण उघडकीस आलं. त्यामुळे रुग्णालयातील आरोपींपर्यंत मोबाईल कसा पोहचतो हा सध्या महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालाय. ललित पाटील प्रकणात यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं. पण या प्रकरणात आता काय होणार, तसेच या आरोपीपर्यंत मोबाईल आणि टॅब कसा पोहचला हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरेल. त्याचप्रमाणे या प्रकरणात नेमकं कोणाचं नाव पुढे येतं आणि त्यांच्यावर काय कारवाई केली जाते हे देखील पाहणं गरजेचं ठरेल. 


हेही वाचा : 


Pune Drug : ऑपरेशन ड्रग्ज! 10 महिने, 409 कारवाया, 504 आरोपी अन् पुण्यात तब्बल 14 कोटींचं ड्रग्ज जप्त