वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमएमआरडीए मैदानावर 17 जानेवारी ते 29 जानेवारी असे 13 दिवस हे प्रदर्शन सुरु राहणार असून प्रवेश विनामूल्य असेल. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रदर्शन सगळ्यांसाठी खुलं राहिल. यादरम्यान संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे.
ग्रामपंचायत स्तरावरील उत्पादकांना हक्काची बाजारपेठ मिळावी या उद्देशाने दरवर्षी हे प्रदर्शन भरवण्यात येतं. 28 राज्यातून 511 स्टॉल्स आणि 70 खाद्यपदार्थांचे स्टॉल इथे लावले जाणार आहेत, अशी माहिती राज्याच्या ग्रामविकास आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
यावर्षी स्वयंसहाय्यता गटांना स्टॉल वाटप ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं आहे. भारतातील विविध संस्कृतीचं स्वादिष्ट खाद्यपदार्थ इथे उपलब्ध असतं. ग्रामीण महिलांनी आणि कारागीरांनी तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू, अस्सल ग्रामीण भागातील खाद्यपदार्थ या प्रदर्शनात उपलब्ध होणार आहेत.
राज्यात आतापर्यंत या अभियानांतर्गत 2 लाख स्वयंसहाय्यता गटांची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामपंचायत स्थरावर 5177 ग्रामसंघ तयार करण्यात आले आहेत. यासाठी 3720.24 कोटी रुपयांचं कर्ज बँकेमार्फत उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.