मुंबई : मुंबई लोकल कधी सुरु होणार हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. अशातच मुंबई लोकल संदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. सर्वसामान्यांना पहाटे लोकल सुरु झाल्यानंतर ते सकाळी 7 पर्यंत आणि रात्री 10 नंतर शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्याची मुभा मिळू शकते. कारण सध्या मुंबईत कोरोनाच्या प्रादुर्भाव नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र मुंबई लोकलसंर्भातील निर्णय मुख्यमंत्र्यांसोबतच्या आढावा बैठकीनंतरच घेण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे.
राज्य सरकारकडून मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये सकाळी 7 वाजेपर्यंत ते रात्री 10 वाजल्यानंतर सर्वसामान्य लोकं मुंबई लोकलमधून प्रवास करु शकतात, असं या प्रस्तावात म्हटलं आहे. मुंबईतील कोरोना स्थिती नियंत्रणात आली आहे. मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यास मुंबई महानगरपालिकेला यश आलं आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं रेल्वेला देण्यासाठी मुंबई लोकल संदर्भात हा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तसेच मुंबई लोकल सुरु करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचंही अनेक नेत्यांकडून सांगितलं जात होतं. परंतु, काल राज्यात ब्रिटनमधील नव्या कोरोना स्ट्रेनचे 8 रुग्ण सापडले आहेत. त्यातील 5 रुग्ण हे मुंबईतील आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार मुंबई लोकलसंदर्भात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई लोकलसंदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
पाहा व्हिडीओ : सर्वांसाठी मुंबई लोकल सुरु होण्याची शक्यता
दरम्यान, कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबई लोकल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी मुंबई लोकल सुरु करण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्यानं वकील, शिक्षक आणि महिलांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र अद्याप सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची दारं खुली करण्यात आली नाहीत. त्यामुळे चाकरमान्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.