Mumbai Local Train Updates: मुंबई : मुंबई लोकलची (Mumbai Local) वाहतूक पुन्हा पूर्वपदावर आली आहे. एका मोटरमनचा मृत्यू झाला होता.  त्याच मोटरमनच्या अंत्यसंस्कारासाठी इतर मोटरमन गेल्यानं लोकलचा खोळंबा झाला.  ज्या मोटरमनचा  मृत्यू झाला त्याच्याकडून रेड सिग्नल असतानाही गाडी पुढे गेली. ही चूक झाल्यानंतर काही वेळाने याच मोटरमनचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. मात्र हा मृत्यू अपघाती नसून कारवाईच्या भितीपोटी केलेली आत्महत्या असल्याचं म्हणणं रेल्वे कर्मचारी युनियचं आहे.


प्रकरण नेमकं काय?


मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी शुक्रवारी (दि.10) प्रगती एक्सप्रेससमोर उडी घेत  आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र, कुटुंबातील सदस्यांना येण्यास विलंब झाल्याने मोटरमनच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास सायंकाळ झाली. त्यात मोटरमनने आत्महत्या केल्याने इतर कर्मचारी त्याच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिले. त्यामुळे कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अतिशय कमी झाली. याचा परिणा असा झाली की, अनेक लोकल गाड्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे शनिवारी मुंबईतील अनेक प्रवाशाचे हाल झाले आहेत.


रेल्वेसेवा विस्कळीत, प्रवाशांचे हाल 


रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, लोकल ट्रेनच्या मोटरमनचा शुक्रवारी मृत्यू झाला. मोटरमनच्या मृतदेहावर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार पार पडणार होते. मात्र, मोटरमनच्या कुटुंबातील सदस्य पोहोचल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी इतर मोटरमन मोठ्या उपस्थित होते. त्यामुळे ते आज कामावर हजर राहू शकले नाहीत. याचा परिणाम असा झाला की, सायंकाळच्या वेळेत एकूण 88 लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या. ट्रेन अचानक रद्द करण्यात आल्याने अचानक अनेक रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत होती. गर्दीमुळे अनेक प्रवाशांना 5-5 ट्रेन सोडून द्याव्या लागल्या. दरम्यान रात्र, 10 नंतर लोकल ट्रेन्सची संख्या वाढली आणि अनेक स्टेशनवरिल गर्दी कमी झाली. 


दरम्यान, मुंबईत शनिवारी चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले होते. मोटरमनच्या आत्महत्येमुळे लोकोपायलट यांच्या कामातील असहकार्यामुळे मुंबई लोकलची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. प्रवासी हैराण झाले होते. लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे अनेकांनी प्लॅटफॉर्मचा आसरा घेतला. लोकलसेवा विलंबानं सुरू असल्यानं गर्दी वाढली होती. अनेकांनी गर्दीनं खचाखच भरलेल्या ट्रेनमधून जीव धोक्यात घालून प्रवास केला.