मुंबई: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक (Central Railway) विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. लोकल विस्कळीत (Mumbai Local Train) झाल्याने रेल्वे स्थानकात गर्दी उसळली आहे. मध्य रेल्वेकडून याबाबत कोणतीही माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
ठाण्यातील कळवा स्थानकाजवळ ओव्हर हेड वायर तुटल्याने लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दुपारी दोन-अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. सायंकाळपर्यंत मध्य रेल्वे अजूनही विस्कळीत आहे. गोरखपुर एक्सप्रेस आणि बदलापूर लोकल डाऊन फास्ट ट्रॅकवर रखडली आहे. बिघाड दुरुस्तीचे काम अजूनही सुरूच असून त्यामुळे कल्याण दिशेने जाणारी सर्व लोकल एक्सप्रेस स्लो मार्गावरून वळवल्या आहेत.
कुठे झाला तांत्रिक बिघाड?
कळवा रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावर पारसिक बोगद्याच्या ठिकाणी ओव्हरहेड वायर तुटली आहे. त्यामुळे कर्जत-कसाराकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल वाहतूक खोळंबली आहे.
यामुळे जलद मार्गावरील लांब पल्ल्याच्या आणि लोकल ट्रेनला मोठा फटका बसला आहे. गेल्या दोन तासांपासून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ठाण्यावरून कर्जत कसाराकडे जाण्याऱ्या लोकल धीम्या मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत. लोकल ट्रेन या जवळपास 20 ते 30 मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती आहे.
मध्ये रेल्वेचे मौन, प्रवाशी संतप्त
ऐन गर्दीच्या वेळी लोकल वाहतूक विस्कळीत झाली असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वेकडून याबाबत प्रसारमाध्यमांनादेखील माहिती देण्यात आली नाही. त्याशिवाय, ट्वीटरवरही कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मध्य रेल्वेने शेवटचे ट्वीट हे दुपारी 1.12 वाजण्याच्या सुमारास केले आहे. या ट्वीटमध्ये दिवाळी, छठ पूजा निमित्ताने चालवण्यात येणाऱ्या साईनगर शिर्डी ते बिकानेर दरम्यानच्या विशेष ट्रेनची माहिती देण्यात आली आहे. मध्य रेल्वेकडून याबाबत अधिक स्पष्टपणे माहिती देण्यात येत नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.