Mumbai Local: मुंब्रा स्थानकात लोकलचा पहिला डबा प्लॅटफॉर्मला घासला असल्याची माहिती आहे. सीएसएमटीवरून टिटवाळ्याला (CSMT To Titwala Local) जाणाऱ्या गाडीचा पहिला डबा प्लॅटफॉर्मला घासल्याने ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे. त्यामुळे ठाण्याहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या या 40 मिनिटे उशीरा धावत आहेत. 


हा डबा प्लॅटफॉर्मला घासल्याने रेल्वे प्रशासनाने काही वेळ या ठिकाणची वाहतूक थांबवली आणि त्याची पाहणी केली. त्यामुळे या स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं. सुमारे 40 मिनीटानंतर या ठिकाणची वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. परिणामी या रुटवरच्या सर्व गाड्या 30 ते 40 मिनीटे उशिरा धावत आहेत. 


सुरुवातीला रेल्वे प्रशासनाने गाड्या का थांबवल्या याची माहिती दिली नव्हती. तशी कोणतीही अनाऊंसमेंटही केली नव्हती. त्यामुळे प्रवाशांमध्ये संदिग्धता निर्माण झाली होती. नंतर प्रशासनाने ही घटना घडल्याचं सांगितलं.


 






मुंब्रा स्थानकात फलाट क्र. 1 वर सीएसएमटी ते टिटवाळा स्लो लोकलच्या डबा प्लॅटफॉर्मच्या काठाला घासल्यामुळे ही वाहतूक थांबववण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याची देखरेख करुन योग्य ती पावलं उचलली. या लोकलचा डबा फक्त प्लॅटफॉर्मला घासला आहे, ती लोकल रुळावरुन घसरली नसल्याचं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. 


 






त्यानंतर आता थांबलेल्या खालील गाड्या सोडण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली, 


K117 कल्याण स्लो लोकल
A57 अंबरनाथ स्लो लोकल
DK21 कल्याण स्लो लोकल
DL49 डोंबिवली स्लो लोकल


ही बातमी वाचा: