Mumbai Local Train: ठाणे आणि मुलुंड दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या ठाणे–मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्टेशनच्या प्रकल्पाला अखेर गती मिळणार असून, या प्रकल्पासाठीचा निधीचा प्रश्न मार्गी लागला आहे.

Continues below advertisement

ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही महत्त्वपूर्ण माहिती दिली असून, केंद्र सरकारने (Central Government) या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या नवीन स्टेशनचे रखडलेले काम आता पुन्हा वेगाने सुरू होणार आहे.

Thane and Mulund New Railway Station: निधीअभावी रखडला होता प्रकल्प

ठाणे आणि मुलुंड दरम्यान उभारण्यात येणाऱ्या या नवीन उपनगरीय रेल्वे स्टेशनला स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत यापूर्वीच मंजुरी मिळाली होती. सुरुवातीला या प्रकल्पाचा खर्च सुमारे 120 कोटी रुपये इतका अपेक्षित होता. त्यानुसार कामाला सुरुवातही झाली आणि जवळपास 60 टक्के काम पूर्ण झाले होते.

Continues below advertisement

मात्र, कालांतराने प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ होऊन तो सुमारे 245 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. स्मार्ट सिटी मिशनची मुदत मार्च 2025 मध्ये संपत असल्याने वाढीव निधी कुठून मिळणार, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. निधीअभावी प्रकल्प थांबण्याची भीती व्यक्त केली जात होती.

Thane and Mulund New Railway Station: केंद्र सरकारचा निर्णायक हस्तक्षेप

या प्रकल्पासाठी खासदार नरेश म्हस्के आणि लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित करत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रकल्पाचे महत्त्व पटवून दिले. रेल्वे मंत्रालय, राज्य सरकार आणि इतर संबंधित यंत्रणांमधील समन्वयाअभावी काम रखडू नये, यासाठी रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीतही त्यांनी ठाम भूमिका मांडली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, केंद्र सरकारने या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च रेल्वे प्रशासनाकडून केला जाईल, असा निर्णय घेतला आहे.

Ashwini Vaishnaw: केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन

हिवाळी अधिवेशनादरम्यान खासदार म्हस्के आणि खासदार शिंदे यांनी पुन्हा एकदा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. त्यानंतर रेल्वे मंत्र्यांनी स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत, या प्रकल्पाची सर्व कामे तात्काळ सुरू करण्यात येतील, असे ठोस आश्वासन दिले. या निर्णयामुळे रखडलेले काम पुन्हा सुरू होणार असून, नवीन स्टेशनचे काम वेगाने पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Thane and Mulund New Railway Station: प्रवाशांना मोठा दिलासा 

हे नवीन उपनगरीय रेल्वे स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतर ठाणे आणि मुलुंड स्थानकांवरील प्रवाशांचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. दररोजच्या गर्दीमुळे होणारी गैरसोय कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. फक्त प्रवास सुलभ होणार नाही, तर या परिसराच्या एकूण विकासालाही चालना मिळणार आहे. वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळून ठाणे–मुलुंड परिसरातील शहरी विकासाला बळकटी मिळेल. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण होत असल्याने ठाणेकरांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आणखी वाचा 

Thane Metro: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती