नवी मुंबई: पनवेलमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पनवेल ते खांदेश्वर स्थानकांदरम्यान गुरुवारी सकाळच्या सुमारास एका १८ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला धावत्या लोकलमधून (Mumbai Crime News) खाली ढकलून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. एक ५० वर्षीय व्यक्ती अचानक लोकलमधील महिलांच्या डब्यामध्ये घुसला होता. यावेळी डब्यातील महिलांनी त्याला जाब विचारला असता संतापलेल्या आरोपीने एका कॉलेजच्या तरुणीला धावत्या (Mumbai Crime News) लोकलमधून खाली ढकलून दिलं. ती तरूणी या घटनेमध्ये गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला अटक केली आहे.(Mumbai Crime News)
Mumbai Crime News: नेमकं काय घडलं?
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी खारघर येथील एका नामांकित शिक्षण संस्थेत अभियांत्रिकीचं शिक्षण घेते. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास तिने आपल्या मैत्रिणीसह पनवेल रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरून सीएसएमटीला जाणारी लोकल पकडली होती. ती महिलांसाठी असलेल्या डब्यातून प्रवास करत होती, गाडी सुटत असतानाच शेख अख्तर नवाझ (५०) हा इसम महिलांच्या डब्यामध्ये घुसला.
महिलांसाठी असलेल्या डब्यात पुरुष आल्याचे पाहून तेथील काही महिला प्रवाशांनी त्याला जाब विचारला आणि खाली उतरण्यास सांगितले. मात्र, शेखने महिलांशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला, रागाच्या भरात शेखने धावत्या लोकलमधून या १८ वर्षीय तरुणीला पाठीमागून जोरदार धक्का दिला. या धक्क्यामुळे तरुणी थेट रुळांवर पडली.
Mumbai Crime News: घटनेत तरूणी गंभीर जखमी
रुळांवर पडल्यामुळे तरुणीच्या डोक्याला, कंबरेला आणि हातापायांना गंभीर दुखापत झाली. लोकलमधून खाली पडल्यानंतर जखमी अवस्थेत तिने आपल्या वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तर, तरुणीला ढकलल्यानंतर आरोपीने खांदेश्वर स्थानकात उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, डब्यातील सतर्क महिला प्रवाशांनी तातडीने रेल्वे पोलिसांना (GRP) याची माहिती दिली. पोलिसांनी शेख अख्तरला खांदेश्वर स्थानकातून ताब्यात घेतलं.
Mumbai Crime News: आरोपीचे मानसिक संतुलन बिघडल्याची शक्यता
पनवेल रेल्वे पोलिसांनी आरोपी शेख विरोधात बीएनएस कलम १०९, तसेच भारतीय रेल्वे अधिनियम कलम १६२ आणि १३८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख हा एकटाच आहे, त्याचे कोणीही नातेवाईक नाहीत. तो इकडे तिकडे फिरतो, प्राथमिक तपासात त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसून येत असून, त्यातूनच त्याने हे कृत्य केले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.