Mumbai Local Mega Block :  मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबई विभागाच्यावतीने रविवारी 26 मार्च रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी रेल्वेने प्रवास करण्याआधी मध्य रेल्वेच्या या मेगा ब्लॉकबाबत जाणून घ्या..


देखभालीची कामं करण्यासाठी मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या मुंबई (Mumbai News) विभागाकडून 26 मार्च 2023, रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याचं प्रसिद्धीपत्रकातून सांगण्यात आलं आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आल्यानुसार, मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार 26  मार्च रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.


 ठाणे-कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.45 या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या त्यांच्या शेड्यूल थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 10मिनिटे उशिराने  गंतव्यस्थानी पोहोचतील.


कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 पर्यंत  सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या वेळापत्रकाच्या थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि 10  मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.  
 
 कुर्ला- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 या वेळेत  पनवेल/बेलापूर/वाशी करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि 
वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.


महत्वाची सूचना -
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला आणि वाशी - पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.  ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गे (ठाणे-वाशी/नेरुळ) सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.