Mumbai Local MegaBlock Updates: आज तुम्ही घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल आणि मुंबई लोकलनं (Mumbai Local News Updates) प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच. घराबाहेर पडण्यापूर्वी सर्वात आधी मुंबई लोकलचं वेळापत्रक (Mumbai Local Timetable) पाहा आणि प्रवासाचं नियोजन करा. रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे.
रविवारी म्हणजेच, 11 फेब्रुवारीला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वे (Central Railway) आणि हार्बर रेल्वे (Harbor Railway) मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहेत. मध्य रेल्वेवर (Central Railway) माटुंगा - ठाणे अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते 3.35 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर, पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.
माटुंगा - ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक
आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत माटुंगा ते ठाण्यादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे या वेळेत नाहूर, कांजूरमार्ग, विद्याविहार या स्थानकांत लोकल सेवा उपलब्ध नसेल.
पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर आज मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल, पनवेल ते ठाणे लोकल सेवा बंद असेल. तर, सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. ठाणे ते वाशी/नेरूळ, बेलापूर/नेरूळ ते उरण दरम्यान लोकल सेवा सुरू असेल.
सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर
पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक कालावधीत सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. यावेळी काही लोकल रद्द करण्यात येतील.
दरम्यान, मुंबई लोकल मार्गांवरील आजचा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे. रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, या कामांसाठी आज ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे.