Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो, (Mumbai) आज रेल्वेप्रवास (Railway) करणार असाल तर, मुंबई आणि ठाणेकरांसाठी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आजपासून मध्य रेल्वेच्या मार्गावर तब्बल 27 तासांचा मेगाब्लॉक (Railway Megablock) घेण्यात येणार आहे. याचं कारण म्हणजे सीएसएमटी-मशीद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान धोकादायक कर्नाक उड्डाणपुलाचं पाडकाम (Carnac Bridge)सुरु करण्यात येणार आहे. तसेच ठाण्यातील कोपरी ब्रिजच्या कामानिमित्त हा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बर मार्गावरील 1 हजार 96 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या काळात अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कर्नाक पुलाच्या कामासोबत कोपरी पुलाच्या कामासाठीही वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
कोपरी ब्रिजच्या कामासाठी रात्री मेगाब्लॉक
ठाण्याकडून मुंबईकडे आणि मुंबईकडून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांना कोपरी ब्रिजजवळ दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी कोपरी ब्रिजच्या रुंदीकरणासाठी एकूण सात गर्डर टाकण्यात येणार आहे. 19 आणि 20 नोव्हेंबरला रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सात तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून यावेळी दोन्ही दिशेची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. यामुळे ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली या शहरांमध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मेगाब्लॉकमुळे प्रभावित होणार वाहतूक
कोपरी पुलाचे गर्डर टाकण्याचे काम शनिवारी-रविवारी मध्यरात्री करण्यात येणार आहे. या कामामुळे सध्या वापरात असलेल्या दोन्ही बाजूंच्या पुलांवरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक-मुंबई आणि मुंबई-नाशिक या दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री म्हणजेच काल रात्री 11 वाजल्यापासून हा मेगाब्लॉक सुरू झाला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी काही उपनगरीय गाड्या भायखळा ते ठाणे दरम्यान धावणार आहेत. रेल्वेनं प्रवाशांना इतर मार्गांवरुन प्रवासाचं नियोजन करण्याचं आवाहन केलं आहे. मुंबई लोकल व्यतिरिक्त, लांब मार्गावरील वाहतूक देखील या मेगाब्लॉकमुळे प्रभावित होणार आहे. तर मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे प्राधिकरण मोहम्मद अली रोडला पी डी'मेलो रोडला जोडणारा कर्नाक उड्डाणपूलाचं पाडकाम करणार आहे. रोड ओव्हर ब्रिज (ROB) तोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि भायखळा स्थानकांदरम्यान 19 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत मुख्य मार्गावर 27 तासांच्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.