Mumbai Megablock Update: मुंबईकरांनो, विकेंडच्या दिवशी घराबाहेर पडण्याचा प्लान करत असाल, तर सर्वात आधी मुंबई लोकलचं वेळापत्रक (Mumbai Local Timetable) पाहा आणि त्यानंतरच बाहेर पडा. उद्या (रविवार, 17 डिसेंबर 2023) मध्य रेल्वे (Central Railway) आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे उद्याच्या आठवडी सुट्टीच्या दिवशी प्रवासाचं नियोजन करत असाल तर आधी वेळापत्रक पाहा आणि त्यानंतरच नियोजन करा. 


उद्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवरील ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. तर पश्चिम रेल्वेवरील माहीम ते सांताक्रुझ मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे, उद्या हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार नाही. 


मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक


मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सीएसएमटी डाऊन जलद लोकल सेवा ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद लोकल कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंडपुढे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. सीएसएमटी/दादरहून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील. सीएसएमटी/दादरला येणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस कल्याण ते ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील. 


पश्चिम रेल्वेवर माहीम ते सांताक्रुझ मार्गावर मेगाब्लॉक


माहीम ते सांताक्रुझ अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक कालावधीत सर्व जलद मार्गांवरील लोकल माहीम आणि सांताक्रुझ/अंधेरी स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर चालवल्या जातील. ब्लॉक दरम्यान काही लोकल रद्द राहतील. तसेच, बोरिवली आणि अंधेरीतील काही लोकल हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालविल्या जातील.


दरम्यान, मुंबई लोकलच्या हार्बर मार्गावरील आजचा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे. रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, या कामांसाठी आज जम्बो मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे.