मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर शुक्रवारी झालेल्या अपघातामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. आता मध्य रेल्वेने रविवारी मेगा ब्लॉक घेतला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायरच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी रविवारी मेगाब्लॉक आहे. सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान स्लो मार्गावरील गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर रविवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असून दिवसा कोणताही ब्लॉक नसेल. 


मेगा ब्लॉक कुठे आणि कधी? 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - विद्याविहार अप आणि स्लो मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48  ते दुपारी 3.49 या वेळेत सुटणाऱ्या स्लो गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांच्या दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाऊन भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील.  
 
घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून  सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावकरीता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. 


पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रेहून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
 
तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.