Mumbai Local Mega Block Updates: मुंबईकरांनो, आज नव्या महिन्यातील पहिला रविवार. आज सुट्टीच्या दिवशी घराबाहेर फिरण्यासाठी किंवा नातेवाईकांकडे जाण्याचं नियोजन करत असाल, तर थोडं थांबा आणि त्यापूर्वी एकदा मुंबई लोकलचं (Mumbai Local News) वेळापत्रक सविस्तर पाहा. आज मुंबई लोकलच्या तिनही मार्गांवर मेगाब्लॉक (Mega Block News) घेण्यात येणार आहे. आज (रविवार, 1 एप्रिल) मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गांवर दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ठाणे-कल्याण आणि पनवेल-वाशी मार्गावर आज मेगाब्लॉक असेल. सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यावेळी तिनही मार्गांवरील अनेक लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
ठाणे-कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.45 या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या त्यांच्या शेड्यूल थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटं उशिरानं पोहोचतील.
कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या वेळापत्रकाच्या थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि 10 मिनिटं उशिराने पोहोचतील.
पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक (बेलापूर/नेरुळ - खारकोपर मार्ग वगळून)
पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
महत्त्वाची सूचना
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर - खारकोपर आणि नेरुळ - खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील. हा मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.