Mumbai Local Mega Block, 26th  March : मुंबईकरांनो सुट्टीनिमित्त फिरण्याचा किंवा कामानिमित्त आज घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल. तर मुंबई लोकलचं (Mumbai Local) वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडाल. कारण देखभालीच्या कामासाठी  मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीएसएमटी ते पनवेल दरम्यानची वाहतूक पाच तास बंद राहणार आहे. सकाळी साडे दहा ते दुपारी साडे तीनपर्यंत सीएसएमटीहून पनवेलसाठी एकही लोकल सुटणार नाही. मात्र पनवेल ते वाशी, आणि सीएसएमटी ते कुर्ला अशा विशेष लोकल चालवल्या जातील. त्यामुळे आज तुम्ही जर तुम्ही घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर तुमच्या प्रवासाचं नियोजन तुम्हाला आधीच करुन घ्या.


 देखभालीचे काम, रुळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी आणि सिग्नल यंत्रणेतील विविध कामासाठी रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचा मध्य (Central Railway), पश्चिम (Western Railway) आणि हार्बरच्या (Harbour Railway) लोकल वाहतुकीवर परिणाम होणार आहे.  प्रवाशांना ठाणे-वाशी मार्गावरून प्रवास करण्याची मुभा असेल. मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे दरम्यान फास्ट मार्गावर दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत. त्यामुळे अप आणि डाऊन मार्गांवरील फास्ट लोकल स्लो मार्गावरून वळवण्यात येतील. पश्चिम रेल्वेवर बोरिवली आणि जोगेश्वरी दरम्यान पाचव्या ट्रॅकवर ब्लॉक असेल, त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.  


ठाणे-कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.45 या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या त्यांच्या शेड्यूल थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 10मिनिटे उशिराने  गंतव्यस्थानी पोहोचतील.


कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 पर्यंत  सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या वेळापत्रकाच्या थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि 10  मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.  
 
 कुर्ला- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 या वेळेत  पनवेल/बेलापूर/वाशी करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि 
वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.