Mumbai Local Mega Block:  रविवार म्हणजे, मुंबईकरांच्या (Mumbai News) हक्काचा सुट्टीचा दिवस. आज जर तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत असाल, त्यासाठी लोकल ट्रेनने प्रवास करायचं असेल तर त्याआधी तुमच्या प्रवासाचं नियोजन करा. या रविवारी मध्य रेल्वेवर (Central Railway) हार्बर (Harbor)  मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज रविवार 5 फेब्रुवारी रोजी  मध्य रेल्वे, मुंबई विभाग विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक होणार आहे. यामुळं मुंबईकरांनी घराबाहेर निघताना लोकलचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावं. 


 माटुंगा-मुलुंड दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर ब्लॉक


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गाने वळवण्यात येतील आणि त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसारच्या स्थानकांवर थांबतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.


ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील त्यांच्या वेळापत्रकानुसारच्या स्थानकांवर थांबतील आणि माटुंगा येथे अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा १५  मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.


 वडाळा रोड-मानखुर्द अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.५४ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.४० ते दुपारी ३.२८ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या  अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.


 ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वांद्रे/गोरेगाव दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार चालतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.३० पर्यंत ट्रान्सहार्बर/मेन लाइनवरून प्रवास करण्याची परवानगी असेल.


ब्लॉक कालावधीत पनवेल - मानखुर्द मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या


रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं आहे की,  ब्लॉक कालावधीत पनवेल - मानखुर्द मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येतील.  प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.  हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.