मुंबई : एकीकडे गुरुग्राममधल्या रायन स्कूलमध्ये सात वर्षांच्या प्रद्युम्नची हत्या झाल्यानं देशभर खळबळ उडाली आहे. तर मुंबईतल्या कांदिवलीमधील रायन स्कूलची दुरवस्थाही 'एबीपी माझा'च्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच दारुच्या बाटल्या आढळून आल्या आहेत.


धक्कादायक बाब म्हणजे कांदिवलीच्या रायन स्कूलचं मुख्य प्रवेशद्वार सोडता इतरत्र कुठेही सुरक्षारक्षक नसल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे शाळेच्या कम्पाऊड वॉलवरुन कोणीही उडी मारुन शाळेच्या आवारात प्रवेश करु शकतं. याशिवाय स्कूल बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टर्सना कायमस्वरुपी ठेवण्यात आलं नसून त्यांच्याकडे ओळखपत्र नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

पालकांकडून मोठी फी उकळणारी रायन स्कूल विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी किती हलगर्जी बाळगते, हे या उदाहरणांवरुन आता उघड झालं आहे.

गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी हरियाणा पोलिसांचं पथक तपासासाठी मुंबईत दाखल झालं आहे. रायन इंटरनॅशनल ग्रुपचं मुख्यालय मुंबईत असून ग्रुपचे सीईओ रायन पिंटो, व्यवस्थापकीय संचालक ग्रेसी पिंटो आणि अध्यक्ष ऑगस्टिन पिंटो यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

प्रद्युम्न हत्या : वडिलांची याचिका, सुप्रीम कोर्टाची हरियाणा सरकार, शाळेला नोटीस


या तिघांनीही अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत शाळेचे समन्वयक जेईस आणि उत्तर विभागाचे प्रमुख फ्रान्सिस थॉमस यांना अटक करण्यात आली आहे.

गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये 7 वर्षाच्या प्रद्युम्न ठाकूरची बस कंटडक्टरनं हत्या केली. खऱ्या मारेकऱ्यांना पकडलं नाही तर आत्महत्या करेन अशा इशारा प्रद्युम्नच्या आईनं दिला आहे.