मुंबई : मुंबईतील (Mumbai Kandiwali Fire News) आगीच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही.कांदिवली महावीरनगर येथील वीणा संतूर बिल्डिंगमध्ये भीषण आग लागली. या भीषण आगीत  दोन जणांचा होरपळून मृत्यू  झाला आहे. तर तीनजण जखमी झालेत. होरपळून मृत्यू झालेल्यांमध्ये एका आठ वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश आहे.  जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून, सध्या कुलिंगचं काम सुरु आहे.  आगीचे कारण अद्याप समोर आले आहे. या आगीमुळं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली (Mumbai Fire News)  याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक याचा तपास करत आहेत.  


कांदिवली येथील वीणा संतूर इमारतीला ही आग लागली होती. इमारतीच्या ग्राउंड प्लस पहिल्या मजल्यावर ही आग लागली.  लेवल एक प्रकारची असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीत अडकलेल्या  नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आला आहे.






मृतांची नावे समोर


या आगीत तीन जखमी असून एकाची स्थिती गंभीर आहे. लक्ष्मी बुरा (वय 40 वर्षे), राजेश्वरी भरतारे (24 वर्षे), रंजन शाह (76 वर्षे) अशी जखमींची नावे आहेत. तर ग्लोरी (43 वर्षे), जोसू रॉबर्ट (8 वर्षे) अशी मृतंची नावे आहेय. दुपारी 12 चा सुमारास ही आग लागली. जखमींवर सरकारतर्फे उपचार करण्यात येणार आहे. 


घाटकोपर  येथील इमारतीला आग


मुंबईत आगीच्या घटना सतत घडत आहेत. परळ परिसरातील अविघ्न पार्क इमारतीला लागलेल्या आगीचे प्रकरण ताजे असतानाच आज घाटकोपर पूर्व येथील पारेख हॉस्पिटलच्या शेजारील इमारतीला आग लागली  घाटकोपर येथील पंतनगर परिसरात असलेल्या विश्वा ब्लॉग इमारतीला मीटरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे दुपारी दोन वाजता आग लागली. विश्वा ब्लॉग या इमारतीला लागलेल्या आगीमुळे शेजारीच असलेल्या पारेख रुग्णालयात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले.