मुलीच्या मदतीने पतीचं कारस्थान : मृणालिनी पाटील
एबीपी माझा वेब टीम | 24 Jun 2016 09:50 AM (IST)
मुंबई : तुला शीना बोरा आणि आरुषीप्रमाणे ठार मारेन, अशी धमकी स्वतःच्या मुलीला दिल्याच्या आरोपामुळे दिग्दर्शिका मृणालिनी पाटील चर्चेत आल्या. मात्र मुलीचे आरोप मृणालिनी पाटील यांनी फेटाळले आहेत. माझ्या 15 वर्षांच्या मुलीच्या मदतीने पतीने कटकारस्थान रचलं, असा दावा मृणालिनी पाटील यांनी केला आहे. मृणालिनी पाटील यांनी आज एबीपी माझासमोर त्याची बाजू मांडली. एखादी आई आपल्या मुलीला जीवे मारण्याची धमकी का देईल?, तसंच मुलीला खोलीमध्ये कोंडून आईला काय मिळणार आहे? असे अनेक प्रश्नही मृणालिनी पाटील यांनी उपस्थित केले. 'बापाचे मुलीमार्फत माझ्यावर आरोप' माझी मुलगी लहान आहे. हे आरोप तिने नाही तर तिच्याकडून करुन घेतलं आहे. यामध्ये तिच्या बाप, अमिताभ दयालचा हात आहे. अमिताभ दयाल आणि मुलीचा वकील रिझवान सिद्दिकी तिच्याकडून हे करुन घेत असल्याचा दावाही मृणालिनी पाटील यांनी केला आहे.