मुंबई : बलात्काराचा आरोप म्हणजे चेष्टा आहे का, असा सवाल मुंबई हायकोर्टानं एका बलात्कार पीडितेला विचारलाय. केवळ पीडितेची इच्छा आहे म्हणून बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याचा खटला रद्द करता येत नाही, असे खडे बोलही हायकोर्टानं पीडित तरुणीला सुनावले आहेत.


 
एमबीबीएसच्या शेवटच्या वर्गात शिकणाऱ्या एका तरुणीने दोन वर्षांपूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला अटक करुन त्याच्यावर आरोपपत्रही दाखल केलं. मात्र अचानक लग्नाची मागणी येऊ लागल्यामुळे मुलीनं बलात्काराचा गुन्हा मागे घेण्याची इच्छा कोर्टासमोर व्यक्त केली. त्यामुळे संतापलेल्या हायकोर्टानं तक्रारदार पक्षाला चांगलंच धारेवर धरलं आहे.

 
एकीकडे महिलांवर होत असलेल्या अत्याचारांची चर्चा होते. फिर्यादीप्रमाणे पोलिस गुन्हा नोंदवतात, तपास करतात, चार्जशीट दाखल होते आणि अचानक पीडित व्यक्ती जर काही प्रलोभनांना भुलून गुन्हा रद्द करण्याची मागणी करत असेल तर समाजावर त्याचे फार गंभीर परिणाम होतील, असं स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे.