मुंबई : मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने संपकरी निवासी डॉक्टरांना फटकारलं. डॉक्टरांच्या सामूहिक रजेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यावेळी उच्च न्यायालयाने संपकरी डॉक्टरांच्या संपावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
एखाद्या कामगाराप्रमाणे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जर डॉक्टर संपाचं हत्यार उपसत असेल तर त्यांचं वर्तन हे डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारं आहे, असं निरीक्षण मुख्य न्यायमूर्ती मंजुळे चिल्लोळ यांनी नोंदवलं.
सामूहिक रजेवर जाण्याचा डॉक्टरांचा अधिकार आहे. परंतु अशाप्रकारे रुग्णांना वेठीस धरुन मागण्या पूर्ण करुन घेणं चुकीचं असल्याचं मत हायकोर्टाने व्यक्त केलं.
दरम्यान उच्च न्यायालयाने मार्डला प्रतिज्ञापत्र सादर करुन भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे याचिकेवरील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे.