खड्डे कसे बुजवावे हे मुंबई पालिकेनं MMRDAकडून शिकावं: हायकोर्ट
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 15 Jul 2016 02:45 PM (IST)
मुंबई: मुंबईतील खड्ड्यासंदर्भात हायकोर्टानं ओढलेले ताशेरे एकून भाजपला नक्कीच आनंदाची उकळी फुटली असेल, तर शिवसेनेच्या पोटात दुखलं असेल. कारण रस्त्यांवरचे खड्डे कसे बुजवावे हे मुंबई महापालिकेनं एमएमआरडीएकडून शिकावं अशी टिप्पणी मुंबई हायकोर्टानं केली आहे. मुंबईतील रस्त्यांच्या दुरावस्थेसंदर्भात हायकोर्टानं सुओ मोटो याचिका दाखल करून घेतली आहे. ज्या रस्त्यांची जबाबदारी एमएमआरडीएवर आहे, त्या रस्त्यांवर खड्डे नसल्याची माहिती हायकोर्टाला सादर करण्यात आली. त्यानंतर कोर्टानं पालिका प्रशासनाला चांगलंच फैलावर घेतलं. रस्त्यांसाठी कोणतं मटेरियल वापरावं याची माहिती एमएमआरडीनं पालिकेला द्यावी, जेणेकरून मुंबईकरांचं भलं होईल. अशा शब्दात हायकोर्टानं पालिका प्रशासनाचे कान टोचले. दरम्यान मुंबईतील खड्ड्यांवरून भाजपनं शिवसेनेविरोधात आवाज उठवायला सुरूवात केली आहे.