Mumbai Heavy rains Red alert : राज्यातील अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली असून मुंबई आणि नवी मुंबईतही जोरदार वाऱ्यासह पाऊस (Mumbai Rain Update) पडत आहे. विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड परिसरात सकाळपासूनच मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्थाही मंदावली आहे.  

विक्रोळी, भांडूपमध्ये नागरिकांना सामानांची बांधाबांध करण्याच्या सूचना

मुंबई महापालिका अलर्ट मोडवर असून विशेषत: डोंगराळ भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे. भांडूप आणि विक्रोळीतील सूर्यनगर परिसरात पोलिसांनी मेगाफोनवरून घोषणा करत नागरिकांना तातडीने सामानाची बांधाबांध करून ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हे स्थलांतर केले जात आहे.

दुसरीकडे, मिठी नदीची पातळी 4.7 मीटरवर पोहोचली असून पाऊस सुरू राहिल्यास कुर्ला आणि वांद्रे किनारी भागात पाणी शिरण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांनी घराबाहेर अनावश्यक फिरणे टाळावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

मुंबईत आज सरकारी-खासगी कार्यालयांना सुट्टी

हवामान खात्याने मुंबईला कालच रेड अलर्ट दिला होता. त्यानुसार येत्या काही तासांमध्ये मुंबईत अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे. सध्या मुंबईतील आकाशात काळ्या ढगांची गर्दी असल्याने अंधारून आले आहे. महापालिकेने यासोबतच खाजगी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र अत्यावश्यक कारणास्तव काम सुरु ठेवायचे असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, संबंधित कार्यालयांनी महापालिकेच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाचा फटका मुंबईतील लोकल ट्रेनला 

पावसाचा फटका मुंबईतील लोकल ट्रेनला (Mumbai Local Train) पण बसताना दिसत आहेत. मध्य रेल्वेमार्गावरील घाटकोपर ते दादर परिसरात रेल्वे रुळांवर मोठ्याप्रमाणावर पाणी साचले, तर माटुंगा रेल्वे स्थानकातील रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे थोडे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. 

  • सध्या मध्य रेल्वेमार्गावरील गाड्या तब्बल 25 ते 30 मिनिटं उशिराने धावत आहेत.
  • हार्बर रेल्वेमार्गावरील (Harbour Railway) लोकल ट्रेनही अर्धा तास उशीरा धावत आहेत.
  • पश्चिम रेल्वेमार्गावरील (Western Railway)लोकल ट्रेन 15 मिनिटं उशिराने धावत आहेत.

हे ही वाचा -

Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस, सरकारचा मोठा निर्णय, शासकीय आणि खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर