Mumbai Rains Local Train Updates: मुंबई आणि उपनगरात कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी उपनगरीय रेल्वे सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. हवामान खात्याने मुंबईसाठी आज पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता. त्यामुळे काल रात्रीपासून मुंबईत तुफान पाऊस सुरु आहे. याचा फटका मुंबईतील लोकल ट्रेनच्या (Mumbai Local Train) वाहतुकीला बसताना दिसत आहेत. मध्य रेल्वेमार्गावरील घाटकोपर ते दादर परिसरात रेल्वे रुळांवर मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. तर माटुंगा रेल्वे स्थानकातील रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. सध्या मध्य रेल्वेमार्गावरील गाड्या तब्बल 25 ते 30 मिनिटं उशिराने धावत आहेत. हार्बर रेल्वेमार्गावरील (Harbour Railway) लोकल ट्रेनही अर्धा तास उशीरा धावत आहेत. तर एरवी सहसा फारसा परिणाम न होणार्‍या पश्चिम रेल्वेमार्गाच्या (Western Railway) वाहतुकीलाही पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन 15 मिनिटं उशिराने धावत आहेत. या सगळ्याचा फटका सकाळच्या वेळेत कामावर जाण्यासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांना बसताना दिसत आहे. रेल्वे प्रवाशांना गाडी येण्यासाठी बराच वेळ प्लॅटफॉर्मवर ताटकळत उभे राहावे लागत आहे. आज अतिवृष्टीची शक्यता असल्याने मुंबई महानगरपालिकेने चाकरमान्यांना फार गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, अशा सूचना दिल्या होत्या.

Continues below advertisement


याशिवाय, कल्याणच्या पुढे जाणाऱ्या मध्य रेल्वेमार्गावर तांत्रिक बिघाडामुळे लोकल ट्रेन उशीरा धावत आहेत. मध्य रेल्वेच्या शहाड आणि आंबिवली या स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे कसाऱ्याहून येणाऱ्या लोकल ट्रेन अधिक उशिराने धावत आहेत. कसारा, आसनगाव, टिटवाळा इथून सुटणाऱ्या लोकल ट्रेनच्या वाहतुकीलाही फटका बसताना दिसत आहे. हवामान खात्याने मुंबईत पुढील तीन ते चार तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागात असणारी रेल्वे स्थानकं पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. कुर्ला आणि घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या परिसरात मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्याप्रमाणावर पाणी साचल्याने प्रवाशांना स्टेशनपर्यंत पोहोचणेही अवघड झाले आहे.


Mumbai Railway Updates news: कोणत्या रेल्वेमार्गावर ट्रेन किती मिनिटं उशीराने?


मध्य रेल्वे- 30 ते 40 मिनिटं


पश्चिम रेल्वे- 15 ते 20 मिनिटं


हार्बर रेल्वे- 25 ते 30 मिनिटं


ट्रान्स हार्बर रेल्वे- 20 ते 25 मिनिटं



आणखी वाचा


मुंबईकरांनो सावधान, घराबाहेर पडताना विचार करा, पुढील चार तास अतिवृष्टी होणार, हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट


Mumbai Rains Live: मुंबईत आजही मुसळधार पाऊस, आकाशात काळ्या ढगांची गर्दी, हवामान खात्याचा रेड अलर्ट खरा ठरला