मुंबई: मुंबई आणि उपनगर परिसरात गेल्या काही तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या सहा तासांमध्ये मुंबईत 300 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पुढील तीन ते चार तास मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हा मुंबईकरांसाठी (Mumbai Rains) सावधगिरीचा इशारा मानला जात आहे. कारण यापूर्वीचा अनुभव पाहता आणखी काही तास पाऊस कोसळत राहिल्यास मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


याशिवाय, मुंबईत सोमवारी दुपारी 1 वाजून 57 मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार आहे. यावेळी समुद्रात 4.40 मीटरच्या लाटा उसळतील. अशावेळी मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास पावसाच्या पाण्याचा निचरा होणार नाही. त्यामुळे रस्त्यांवर आणखी पाणी साचू शकते. त्यामुळे आता मुंबईकरांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे मानले जात आहेत. पुढील काही तास पाऊस सुरु राहिल्यास कामावर निघालेल्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागू शकतो.






मुंबईतील शाळांना सुट्टी


गेल्या काही तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाची पुढील स्थिती पाहून दुसऱ्या सत्रातील शाळा होणार की नाही, याचा निर्णय घेतला जाईल, मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


हार्बर रेल्वेसेवा ठप्प, मध्य रेल्वेही विस्कळीत


मुंबईतील मुसळधार पावसामुळे शहराची लाईफलाईन असणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर पाणी साचले होते. त्यामुळे मुंबई-ठाणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. पावसाचा जोर ओसरल्यानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली, मात्र, ही वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या स्थानकांवर मोठी गर्दी जमली आहे. तर दुसरीकडे हार्बर रेल्वेमार्गावर चुनाभट्टी मार्गावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. हार्बर मार्गावर अनेक ट्रेन्स एकापाठोपाठ रुळांवर उभ्या आहेत. या सगळ्यामुळे कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहेत.


आणखी वाचा


LIVE Updates: मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात पुढील 3-4 तास मुसळधार पावसाचा इशारा , महाविद्यालयांना सुट्टी जाहीर


रत्नागिरीला पावसानं झोडपलं; दिवसभरात मुसळधार पावसाचा इशारा, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी