हार्बर रेल्वेवर मानखुर्द आणि गोवंडी स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला आणि रुळाचा तुकडा पडला. मात्र या तड्यांवर उपाय म्हणून रुळांना चक्क फडकं बांधल्याचं समोर आलं आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे अशा अवस्थेत त्या रुळांवरुन एक नाही तर तीन लोकल धावल्या. त्यामुळे रेल्वे सेवा सुरु ठेवण्यासाठी लोकल प्रशासनाने शेकडो मुंबईकरांचा जीव धोक्यात का घातला असा प्रश्न आहे.
खरं तर रेल्वे रुळाला तडा गेल्यानंतर त्याची दुरुस्ती होईपर्यंत लोकल सेवा पूर्णपणे थांबवणं अपेक्षित होतं. तडा गेल्यानंतर सर्वसामान्यपणे ही प्रक्रिया पार पाडली जाते. मात्र तसं न करता निव्वळ कपडा बांधून लोकलची वाहतूक करण्यात आली.
या प्रकाराचा व्हिडिओ 'एबीपी माझा'कडे आहे. रेल्वे प्रशासनाच्या 'अक्कलहुशारी'ची बातमी 'एबीपी माझा'ने दाखवल्यानंतर हार्बर मार्गावरील रेल्वे ट्रॅक दुरुस्त करण्यात आला.
लोकलचा वेग आणि वजन, रुळावरील ताण पाहता, फडक्याचा कितपत उपयोग झाला असेल, याबाबत शंकाच आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल प्रवाशांनी चीड व्यक्त केली आहेच. मात्र मुळात प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याची रिस्क प्रशासनाने का घेतली, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
पाहा व्हिडीओ :