मुंबई : मुंबईतल्या घाटकोपरमध्ये साईदर्शन ही इमारत कोसळल्यानंतर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. ललित ठक यांनी या दुर्घटनेत आपली तीन महिन्यांची चिमुरडी गमावली. त्यांची पत्नी आयसीयूमध्ये आहे, तर आईचा शोध अद्याप लागलेला नाही.

'सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास आंघोळ आटपून मी तयारी करत होतो. त्याचवेळी काहीतरी हलल्यासारखं वाटलं. मी बायकोला सांगितलं तातडीने मुलीला घेऊन बाहेर पड. आईलासुद्धा तिच्यासोबत पाठवलं. त्या तिघी घराच्या एका बाजुला होत्या, तर मी मागच्या. तेवढ्यात अख्खी इमारत कोसळली.' अशी आँखोदेखी ललितने सांगितली.

'मी माझ्या डोळ्यासमोर मृत्यूला पाहिलं. मी वाचलो, पण मी ज्या बाजुला होतो, तिथेच कुटुंबातील सगळ्यांना ठेवलं असतं, तर आज सगळे माझ्यासोबत सुखरुप असते. माझी ही चूक झाली, पण क्षणात होत्याचं नव्हतं होईल याची कल्पना नव्हती.' अशी खंत ललित व्यक्त करत आहे.

'रहिवासी इमारत असताना कुठल्याही परवानगीविना व्यावसायिक वापर करुन सुनिल शितपने इमारतीच्या तळ मजल्यावर अनधिकृत फेरबदल केले. इमारतीच्या मूळ पिलरसोबत त्याने छेडछाड केली.' असा दावा ललितने केला आहे. ललितला फाशीची शिक्षा द्या, नाहीतर मी त्याला कापेन, अशा शब्दात ललितने संतापही व्यक्त केला.

घाटकोपर इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर पोहचला आहे. तर सुनील शिताप याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

पाहा व्हिडिओ :