मुंबई : एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटांच्या मोबदल्यात कमी पैसे देऊन लूट करणाऱ्यांच्या दादागिरीचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. जनतेच्या लुटीसोबतच बातमीची शहानिशा करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना मारहाण केल्याचीही घटना घडली आहे.

मुंबईच्या विक्रोळी भागातल्या हरियाली व्हिलेजमध्ये 5-6 दुकानदार 500 रुपयांच्या जुन्या नोटा घेऊन 400 रुपये, तर दहा हजार रुपयांच्या जुन्या नोटा घेऊन 8 हजार रुपये देत असल्याची माहिती पत्रकारांना मिळाली. या बातमीची शहानिशा करण्यासाठी चार पत्रकार घटनास्थळी गेले असता रांगेत नागरिकांना पैसेवाटप होत असल्याचं समोर आलं.

या प्रकाराचं व्हीडिओ रेकॉर्डिंग होत असल्याची माहिती पैसे लुटणाऱ्यांना मिळाली. त्यानंतर या दुकानदारांनी चार पत्रकारांना मारहाण केली. यामध्ये 'महाराष्ट्र 1' चे पत्रकार प्रशांत बढे, 'झी 24 तास'चे प्रतिनिधी अमोल पेडणेकर आणि कॅमेरामन मयुर राणे, 'सामना'चे पत्रकार संतोष पांडे यांना जबर मारहाण करण्यात आली.

विशेष म्हणजे पोलिस चौकी जवळ असूनही पोलिसांनी मदत न केल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर चौघांनीही विक्रोळी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.