मुंबई : गोरेगावमधल्या आरे कॉलनीतील जंगलाला लागलेली भीषण आग तब्बल सहा तासांनी आटोक्यात आली आहे. अग्निशनम दलाच्या जवळपास 100 जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री साडेबाराच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवलं.
आरे कॉलनीतील इन्फीनिटी आयटी पार्कजवळच्या जंगलात सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास आग लागली होती. जवळपास 3 ते 4 किलोमीटर परिसरात ही आग पसरली होती. आगीचं रौद्र रुप पाहता पोलिसांनी इथल्या आदिवासींना सुरक्षितस्थळी हलवलं.
डोंगराळ भाग असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे पोहोचू शकल्या नाहीत. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी पायी जाऊन आग विझवली. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांच्या दहा तुकड्यांनी संपूर्ण रात्रभर या परिसरात सर्च ऑपरेशन केलं.
मात्र या आगीमागे मोठं षडयंत्र असल्याचा आरोप केला जात आहे. आरे कॉलनीतील जमीन मिळवण्यासाठी जाणूनबुजून ही आग लावल्याचा आरोप होत आहे. दरम्यान या आगीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश दिल्याचं सहाय्यक मनपा आयुक्त संजोग कबरे यांनी सांगितलं. आरोपांमध्ये तथ्य असेल तर दोषींविरोधात कारवाई केली जाईल, असं शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी सांगितलं
आग लागली की लावली हा नंतरचा भाग आहे, याची चौकशीही होईल. पण सध्यातरी आरे कॉलनीतील हा हिरवागार डोंगर मात्र आगीच्या या ज्वाळांमध्ये भस्मसात झाला आहे.