मुंबई : मुंबईत घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर ट्रकचा धक्का लागल्यानं पादचारी पुलाचा सांगाडा कोसळल्याची घटना घडली आहे. गोवंडीजवळच्या बैंगनवाडी सिग्नलवर मध्यरात्रीच्या वेळी ही घटना घडली. पुलाच्या सांगाड्याखाली दबून 4 गाड्यांचा चुराडा झाला आहे. तर या घटनेत 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण पुलाच्या पडलेल्या ढिगाऱ्यामुळे पूर्ण रस्ता वाहतूकीसाठी ठप्प झाला आहे. सध्या रस्ता रिकामा करण्यासाठी पुलाचा मलबा हटवण्याचे काम सुरू आहे.
ज्यावेळी घटना घडली त्यावेळी पुलाखाली दोन वाहनं उभी होती. या घटनेत ट्रक, बाजूला पार्क केलेल्या दोन रिक्षा आणि एक टेम्पो चिरडला गेला. घटनेची माहिती मिळताच पुलाचा मलबा हटवण्यचे काम तत्काळ हाती घेण्यात आले. तसेच त्यासाठी क्रेनही घटनास्थळी पोहोचल्या होत्या. तसेच अपघातानंतर स्थानिक पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली.
रात्री 2 वाजण्याच्या सुमारास घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर सुरू असलेल्या पालिकेच्या उड्डाण पुलाच्या कामासाठी एक ट्रक सिमेंट चा मोठा खांब घेऊन चालला होता. या ट्रकचा धक्का पुलाखाली असलेल्या सांगाड्याला लागला. त्यामुळे हा सांगाडा थेट घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर कोसळला आणि अपघात झाला. तर या अपघातात ट्रकचा चालक आणि आणखी एक इसम गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
अपघाताची माहिती मिळताच, वाहतूक पोलीस, देवनार पोलीस आणि अग्निशमन दल घटानास्थळी पोहोचले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने हा लोखंडी सांगाडा काढण्याचं काम सुरू झालं. या घटनेनंतर घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील वाहतूक ठप्प होती.
दरम्यान, गेल्याच वर्षी मुंबईतील सीएसटी रेल्वे स्थानकाबाहेर बांधण्यात आलेला फूट ओव्हर ब्रिज कोसळून अपघात झाला होता. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला होता, तर जवळपास 34 लोक गंभीर जखमी झाले होते.
संबंधित बातम्या :
मुंबई आयआयटीत राष्ट्रविरोधी घोषणा दिल्यास कारवाई होणार, हॉस्टेलची नवी नियमावली
मुंबई महापालिकेचा अजब कारभार, मराठी शाळेत शिकले म्हणून पात्र उमेदवारांना नोकरी नाकारली