मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या आलिशान 'अँटिलिया' इमारतीत आग लागली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही.

अँटिलियाच्या टेरेसवर आग लागली होती. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या वेळीच घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर आग विझवण्यात यश आलं.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष असलेल्या मुकेश अंबानी यांची अँटिलिया ही 27 मजली इमारत दक्षिण मुंबईत अल्टामाऊंट रोडवर आहे. 4 लाख चौरस फुटांवर असलेली ही इमारत 570 फूट उंच आहे.

लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसनंतर अँटिलिया ही कदाचित जगातील दुसरी सर्वात महागडी रहिवासी इमारत आहे. याची किंमत अंदाजे 100 कोटी रुपये इतकी आहे.

8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला, तरी ही इमारत हलणार नाही, असा दावा केला जातो. इमारतीच्या 6 मजल्यांवर गॅरेज असून 168 गाड्या मावू शकतात. पार्किंग लॉटवर लॉबी असून 9 लिफ्ट पाहुण्यांना घरात घेऊन जातात.