मुंबई : मंत्रालयात पुन्हा एकदा एका शेतकऱ्यानं अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने वेळीच मंत्रालयाचे सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे दुर्घटना टळली.


56 वर्षीय गुलाब मारुती शिंगारे या शेतकऱ्याने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंगावर रॉकेल ओतून घेतलं. मंत्रालयाचे सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी शिंगारेंना वेळीच अडवल्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. गुलाब शिंगारे यांना मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

शिंगारे हे मूळ नाशकातील लासलगावचे रहिवासी आहेत. पोलिस पाटील आणि जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या घरावर कब्जा केल्याचा आरोप शिंगारे यांनी केला आहे.

न्याय मिळावा म्हणून शिंगारे मंत्रालयात आले होते. मात्र या ठिकाणी नीट वागणूक न मिळाल्यामुळे शिंगारे यांनी टोकाचं पाऊल उचललं.

खरं तर, राज्यात झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल कार्यपद्धतीचा अवलंब करा, असा आदेश सरकारने काढला आहे. त्यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या होत्या.

मंत्रालयीन अधिकाऱ्यांना रोज दुपारी 2.30 ते 3.30 ही वेळ सामान्यांना भेटण्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.

'मंत्रालय की आत्महत्यालय?' असा प्रश्न उपस्थित होण्याइतक्या आत्महत्या किंवा आत्महत्येच्या प्रयत्नांचा घटना गेल्या काही दिवसांमध्ये मंत्रालयात घडल्या आहेत.

मंत्रालयात विष प्राशन केलेले 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली. संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं.

मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारलेल्या हर्षल रावते या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हीच धोक्याची घंटा लक्षात घेऊन मंत्रालयात जाळ्या बसवण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या :

सामान्यांच्या तक्रारी सोडवा, आत्महत्यासत्रानंतर सरकारच्या सूचना

आत्महत्या टाळण्यासाठी मंत्रालय इमारतीच्या भिंतीला जाळ्या

मंत्रालयाच्या 5 व्या मजल्यावरुन उडी, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

मंत्रालयाबाहेर 25 वर्षीय तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अखेर झुंज अपयशी, धर्मा पाटील यांचं निधन