मुंबई : मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंसाठी मांडलेल्या विश्वास प्रस्तावाविरोधात  विरोधकांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव चर्चेला येण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी विश्वास ठराव मंजूर करुन घेतला, हे नियमबाह्य आहे. विधिमंडळातील विरोधकांच्या अधिकारांची सत्ताधाऱ्यांकडून पायमल्ली होत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला आहे.




राज्यपालांनी सरकारला निर्देश द्यावा अशी मागणी विरोधकांनी राज्यपालांकडे केली आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांविरोधात आज विधानसभेत मांडण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हरिभाऊ बागडे यांच्यासाठी विश्वास प्रस्ताव मांडला. जो आवाजी मतदानानं मंजूरही झाला. मात्र असा प्रस्तावच मांडता येत नसल्याचं विरोधी पक्षांचं म्हणण आहे.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे सभागृहात पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप विरोधकांचा होता. विशेष म्हणजे सरकारमध्ये राहून सरकारला प्रत्येक वेळी अडचणीत आणणाऱ्या शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं.