मुंबई : मुंबईत अंधेरी-कुर्ला रोडवर बेस्ट बसला आग लागली आहे. चकाला परिसरात लागलेल्या या आगीत बस जळून खाक झाली आहे. बसला लागलेल्या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. बससोबत शेजारी उभी असलेली एक कारही आगीत भस्मसात झाली आहे.
अंधेरीहून कुर्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या बेस्टच्या बसने अचानक पेट घेतला. बसमधील सर्व प्रवासी वेळीच बाहेर आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. आग लागताच चालक आणि वाहकासह सारे बसबाहेर आले. बस जागीच जळून खाक झाली आहे. बर्निंग बसचा थरार पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. बसच्या शेजारी असलेली कारही आगीत जळून खाक झाली आहे.
बसला आग लागल्यानंतर अंधेरी-कुर्ला रस्त्यावरील चकालाजवळील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. आता या रस्त्यावरील वाहतूक धिम्या गतीनं सुरु आहे.