Mumbai Drugs Case LIVE Updates : आर्यन खानची सुनावणी उद्यावर ढकलली, आजची रात्रही तुरुंगात काढावी लागणार

Mumbai Drugs Case LIVE Updates : क्रूझ ड्रग्स प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणी सध्या अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी होताना दिसत आहेत. या प्रकरणाशी संबंधित सर्व घडामोडी फक्त एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 27 Oct 2021 05:33 PM
आर्यन खानची सुनावणी उद्यावर ढकलली, आजची रात्रही तुरुंगात काढावी लागणार

आर्यन खानच्या जामीनावर आजही निर्णय झाला नसून आजची रात्रही त्याला तुरुंगातच काढावी लागणार आहे. आता त्याच्या जामीन याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. 

नवाब मलिक यांनी स्वतःचा पत्ता लिहून पत्र पाठवलं- मोहित कंबोज

मंत्री नवाब मलिक यांनी काल पत्रकार परिषदेत एनसीबी ऑफिस मधून एका अधिकाऱ्यांनी एक पत्र पोस्ट केल्याचा दावा केला होता, मात्र भाजप नेते मोहित कंबोज यांनी यावरुन नवाब मलिकांवर आरोप केले आहेत. पत्र मुंबई नव्हे तर बिहारचा बेगूसराय या ठिकाणाहून मंत्री नवाब मलिक यांनी स्वतःच्या पत्ता लिहून पाठवलं असल्याचा दावा त्यांनी केला आहे, नवाब मलिक पहिल्या दिवसापासून खोटे बोलत आहेत आणि विरोधकांचं नाव खराब करण्यासाठी नवाब मालिकांचे डाव आहे, त्यामुळे मी राज्यपालांकडून मागणी करत आहे की नवाब मलिक यांची मंत्रिमंडळामधून हकालपट्टी केली पाहिजे 


 





मी जन्मानं हिंदू होतो आणि आताही हिंदूच आहे-समीर वानखेडे

Nawab Malik VS Sameer Wankhede : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला सध्या वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरणी सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. अशातच अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक या प्रकरणी दररोज नवनवे दावे करत आहेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच, त्यांच्या पहिल्या विवाहाचा निकाहनामाही ट्विटरद्वारे जारी केला आहे. अशातच याप्रकरणी समीर वानखेडे यांनी एबीपी माझाशी बातचित केली. त्यावेळी त्यांनी मी जन्मानं हिंदू होतो आणि आताही हिंदूच आहे, असं म्हटलं आहे. 

नवाब मलिकांच्या आरोपांना समीर वानखेडेंचे वडील उत्तर देणार

नवाब मलिकांच्या आरोपांना समीर वानखेडेंचे वडील उत्तर देणार, दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद

क्रूझ पार्टी प्रकरणात एक बाब समोर आली की या पार्टीत एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सप्लायर होता- मलिक

Nawab Malik VS Sameer Wankhede: मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांच्याकडून आरोपांचा 'सिलसिला' सुरुच आहे. आज पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी पुन्हा वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांनी म्हटलं आहे की, क्रूझ पार्टी प्रकरणात एक बाब समोर आली की या पार्टीत एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सप्लायर होता. त्याठिकाणी त्याची गर्लफ्रेंड देखील होती. बंदूक घेऊन तो दाढीवाला त्याठिकाणी होता. त्याची समीर वानखेडेंसोबत मैत्री आहे. गोव्यात देखील यांनी मोठे व्यवहार केले होते, असा आरोप मलिक यांनी केला आहे. आम्ही एनसीबीला सांगितलं होतं की एक दाढीवाला व्यक्ती होता. त्याची मैत्रीण देखील त्याठिकाणी होते. त्यांचे अनेक व्हिडिओ आमच्याकडे आहेत आम्ही ते व्हिडिओ देऊ, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक यांना सरकारी अधिकाऱ्यांना धमकी द्यायची असेल तर त्यांनी आधी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांची मागणी

नवाब मलिक यांना सरकारी अधिकाऱ्यांना धमकी द्यायची असेल तर त्यांनी आधी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांची मागणी.
राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा अशी मागणीही मंगलप्रभात लोढा यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे

पार्श्वभूमी

Drug Case : आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी; आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नसल्याचा वकील रोहतगींचा युक्तिवाद


Aryan Khan Bail Plea Hearing : क्रूझ ड्रग प्रकरणी अटकेत असणारा बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) च्या जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी केली जाणार आहे. काल (मंगळवारी) मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. न्यायालयाचं कामकाज संपल्यानं या प्रकरणाची सुनावणी आता आज (बुधवारी) घेतली जाणार आहे. त्यामुळे आर्यन खानची आजची रात्रही तुरुंगातच जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान या प्रकरणातील मनीष राजगढिया आणि अवीन साहू यांना जामीन मंजूर झाला आहे.  


आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, त्यानं ड्रग्ज घेतलेले कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एनसीबीनं अधिाकरांचा दुरुपयोग करत आर्यनला पकडलं. त्याची वैद्यकीय चाचणीदेखील केली नाही. अरबाजच्या बुटात काही प्रमाणात ड्रग्ज सापडलं, असा युक्तीवाद आर्यन खानचे वकील माजी अॅटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी काल सुनावणी दरम्यान कोर्टात केला.  


दरम्यान आर्यनच्या जामिनाला एनसीबीचा विरोध केला होता. गुणवत्तेच्या आधारावर आर्यनच्या जामिनाची याचिका फेटाळून लावण्याची एनसीबीच्या वकिलांनी मागणी केली होती. तपासाच्या या टप्प्यावर जामीन दिल्यास खटल्यावर थेट परिणाम होईल, असा दावा एनसीबीच्या वतीनं करण्यात आला होता. या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल फुटला आहे, त्यामुळे प्रभाकर साईल यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची न्यायालयानं दखल घेऊ नये, अशी विनंती एनसीबीच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केली होती. 


दरम्यान, आर्यनच्या सुनावणीच्या वेळी कोर्टरुममध्ये प्रचंड गर्दी झाली होती. कोर्टातील गर्दी वाढल्यानं न्यायाधीशांनी कामकाज काही वेळ थांबवलं होतं. गेल्या आठवड्यात बुधवारी विशेष एनडीपीएस कोर्टानं आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आर्यनच्या वकिलांनी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात विशेष एनडीपीएस कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्या जामिनावर सुनावणी झाली आहे. 


Cruise Drug Case : मुंबई पोलिसांनी पंच प्रभाकर साईल यांचा जबाब नोंदवला; पहाटे तीनपर्यंत सुरु होती प्रक्रिया, NCBकडून आज चौकशीची शक्यता


Mumbai Cruise Drugs Case : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात सेटलमेंट करण्यासाठी 25 कोटींची मागणी केल्याचा दावा करणाऱ्या प्रभाकर साईलनं रात्री मुंबई पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला. मुंबई पोलिसांचे झोन वनच्या डिसीपींच्या ऑफिसमध्ये प्रभाकर साईल मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता पोहोचले होते. त्यानंतर जवळपास 8 तासांपर्यंत त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. प्रभाकर सईल (Prabhakar Sail) आर्यन खानला ज्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे, त्या मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणातील मुख्य साक्षीदार आहे. तर दुसरा साक्षीदार असलेल्या किरण गोसावीचा बॉडिगार्डही आहे. 


प्रभाकर सईल यांचा दावा आहे की, मुंबई ड्रग केस प्रकरणात सेटलमेंटसाठी 25 कोटी रुपयांच्या डीलबाबत ऐकलं होतं. त्यानंतर 18 कोटी रुपयांची डील फायनल होणार होती. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, त्यातील 8 कोटी रुपये एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते. किरण गोसावी पेशानं गुप्तहेर आहे आणि ड्रग्ज केस प्रकरणातील पंचही आहे. प्रभाकर सईलनं माध्यमांसमोर येऊन केलेल्या खळबळजनक गौप्यस्फोटानंतर किरण गोसावी फरार आहे. प्रभाकरचं म्हणणं आहे की, जेव्हापासून त्यांनी या प्रकरणातील सत्य सर्वांसमोर आणलं आहे, तेव्हापासून गोसावी फरार आहेत, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका आहे. 


प्रभाकर यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सॅम डिसूझा नावाच्या एका व्यक्तीचाही उल्लेख केला आहे. प्रभाकरनं दिलेल्या माहितीनुसार, सॅम डिसूझाशी त्यांची भेट एनसीबीच्या ऑफिसबाहेर झाली होती. त्यावेळी ते केपी गोसावीला भेटण्यासाठी गेले होते. दोघेही एनसीबी ऑफिसमधून लोअर परेलमध्ये बिग बाजारजवळ गाडीनं गेले होते. अॅफिडेविटमध्ये दावा करण्यात आला आहे की, गोसावीनं सॅम नावाच्या व्यक्तीशी फोनवर 25 कोटी रुपयांपासून बोलणं सुरु करुन 18 कोटी रुपयांमध्ये डिल फायनल केली होती. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देण्यात आले होते. 


दरम्यान, एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वात क्रूझ ड्रग्स प्रकरणाची चौकशी केली जात आहे. ज्यामध्ये बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतरही आरोपी अटकेत आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.