मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरण आणि इतर पाच प्रकरणांचा तपास आता एनसीबीच्या नव्या एसआयटीकडून होणार आहे. या प्रकरणी आता तपासाचा नवा अंक सुरु झाला असून एनसीबीने आर्यन खान आणि नवाब मलिक यांचे जावाई समीर खान यांना समन्स पाठवलं आहे. त्यांनी आजच चौकशीसाठी हजर रहावं असं त्यात सांगितलं आहे. 


दरम्यान, आर्यन खान आज संध्याकाळी सहाच्या दरम्यान एनसीबीच्या कार्यालयात येणार असल्याची माहिती आहे. एनसीबीचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप झाल्यानंतर त्यांच्याकडून आर्यन खान आणि इतर पाच महत्वाच्या प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आला. एनसीबीच्या स्पेशल टीमचे प्रमुख संजय सिंह (Sanjay Singh) आता या सर्व प्रकरणांचा तपास करणार असून समीर वानखेडे त्यांना मदत करणार आहेत. संजय सिंह शनिवारी मुंबईत दाखल झाले आहेत. 


दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी सुरु असल्याचं सांगत नवाब मलिक यांनी थेट समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असून किरण गोसावी यांने 18 कोटी रुपयांची डील केल्याचा आरोप प्रभाकर साईल यांने केला होता. यामधील 8 कोटी रुपये समीर वानखेडे यांना मिळणार होते असंही त्यांने सांगितलं. त्यानंतर या प्रकरणाला गंभीर वळण लागलं असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. 


समीर वानखेडे यांचा खुलासा
समीर वानखेडे एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, "आर्यन खान केस प्रकरणाचा तपास माझ्याकडून काढून घेण्यात आला नाही. या संबंधी मीच न्यायालयात एक रिट पीटिशन दाखल केली होती आणि या प्रकरणाचा तपास केंद्रीय संस्थेकडून करण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे आर्यन खान आणि समीर खान यांच्या प्रकरणाचा तपास आता दिल्लीतील केंद्रीय तपास यंत्रणेच्या एसआयटी कडून करण्यात येणार आहे. त्यामुळे हा तपास आता एनसीबीच्या दिल्लीतील आणि मुंबईतील टीममध्ये समन्वयाने करण्यात येणार आहे."